अबब... नगररचना उपसंचालकाकडे ३२ कोटींची माया; ‘ईडी’ची कारवाई, ९ कोटी रोख, २३ कोटींचे सोने
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 02:37 IST2025-05-16T02:35:39+5:302025-05-16T02:37:09+5:30
महापालिका क्षेत्रातील ४१ बेकायदा इमारतींच्या विकासात सहभागी एका सिंडीकेटशी संबंधित कारवाईचा एक भाग म्हणून हे छापे टाकण्यात आले.

अबब... नगररचना उपसंचालकाकडे ३२ कोटींची माया; ‘ईडी’ची कारवाई, ९ कोटी रोख, २३ कोटींचे सोने
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: बेकायदा जमीन विकास व मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीने वसई-विरार मनपाचे नगररचना उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्या मुंबई आणि हैदराबाद येथील १३ ठिकाणी छापे टाकून ३२ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची बेहिशेबी मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये ८.६ कोटी रुपयांची रोख आणि २३.२५ कोटी रुपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे.
राखीव ६० एकर जमिनीवर बेकायदा इमारती उभारल्या
महापालिका क्षेत्रातील ४१ बेकायदा इमारतींच्या विकासात सहभागी एका सिंडीकेटशी संबंधित कारवाईचा एक भाग म्हणून हे छापे टाकण्यात आले. महापालिकेने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि डंपिंग ग्राउंडसाठी राखीव ठेवलेल्या सुमारे ६० एकर जमिनीवर या इमारती बांधण्यात आल्या होत्या. या सिंडीकेटने नगरपालिकेच्या मंजुरी बनावट केल्याचा आणि अतिक्रमित सार्वजनिक जमिनीवर बांधलेल्या निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता विकल्याचा आरोप आहे.
२००९ पासून सुरू आहे खटला, आता संपूर्ण नेटवर्क शोधणार...
वसई-विरार महानगरपालिकेच्या अधिकार क्षेत्रात सरकारी आणि खासगी जमिनीवर निवासी-कम-व्यावसायिक इमारतींच्या बेकायदेशीर बांधकामाशी संबंधित हा खटला २००९ पासून सुरू आहे.
‘हे फसवणुकीचे प्रकरण होते, ज्यामध्ये विकासकांनी जाणूनबुजून कायदेशीर मंजुरी नसलेल्या इमारतींमध्ये युनिट्स विकून जनतेची फसवणूक केली. आता आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जात आहे.
त्यात सहभागी व्यक्ती आणि संस्थांचे संपूर्ण नेटवर्क शोधले जाईल. त्यानंतरच या प्रकरणात झालेल्या मनी लाँड्रिंग आणि फसवणुकीची व्याप्ती निश्चित केली जाईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.