भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 06:50 IST2025-12-26T06:49:46+5:302025-12-26T06:50:01+5:30
बविआतून पक्षांतर केलेल्यांना तिकीट देऊ नका बविआतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने भाजपतील जुने, एकनिष्ठ कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहे आहेत.

भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई-विरार : उमेदवारी अर्ज भरण्याची ३० डिसेंबर ही शेवटची तारीख असल्याने एक-दोन दिवसांत युती बाबत चर्चा करू. २०१७ साली भाजपच्या ६१ तर शिवसेनेच्या २२ जागा निवडून आल्या होत्या. आज २०२५ मध्ये परिस्थिती खूप बदलली आहे. आमची ५० टक्के जागांची मागणी आहे. भाजपा मोठा पक्ष आहे म्हणून त्यांनी काही जागा जास्त घेतल्या तर हरकत नाही, अशी भूमिका शिंदेसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे.
बविआतून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने भाजपतील जुने, एकनिष्ठ कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहे आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आपसात नाराजी व्यक्त करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आता तर बंडाचा पवित्रा घेतला आहे. ‘ज्यांना तिथे पुन्हा तिकीट दिलेले नाही, अशा बविआतून आलेल्या माजी नगरसेवकांना भाजपमधून तिकीट देऊ नका, जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू नका’, असे पत्र त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक यांनी हे विधान केल्यामुळे वेगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
निष्ठावंताविरुद्ध नव्याने आलेल्यांत संघर्ष?
बविआ पक्षात किंमत नव्हती, अशांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. याबाबत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सह्यांची मोहीम घेऊन बविआमधून आलेल्यांना तिकीट देऊ नका, असे पत्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना दिले आहे. निष्ठावंतांना डावलून तिकीट दिले तर वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा वसईतील एका ज्येष्ठ नेत्यानेही दिला आहे. त्यामुळे आता भाजपमध्ये निष्ठावंत विरुद्ध नव्याने दाखल झालेले असा संघर्ष बघायला मिळणार आहे.