भररस्त्यात तलवार भिरकावून दहशत माजवण्याचा प्रयत्न; ४ आरोपींकडून ५ तलवार, ४ खंजीर आणि १८ कोयते जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 20:15 IST2023-08-05T20:15:14+5:302023-08-05T20:15:44+5:30
शहरातील नागरी वस्तीतील भर रस्त्यात एक तरुण तलावारीने लोकांमध्ये दहशत माजवत असल्याचा व्हिडीओ ४ ऑगस्टला सोशल मीडियावर व्हायरल झाला.

भररस्त्यात तलवार भिरकावून दहशत माजवण्याचा प्रयत्न; ४ आरोपींकडून ५ तलवार, ४ खंजीर आणि १८ कोयते जप्त
(मंगेश कराळे)
नालासोपारा:- शहरातील नागरी वस्तीतील भर रस्त्यात एक तरुण तलावारीने लोकांमध्ये दहशत माजवत असल्याचा व्हिडीओ ४ ऑगस्टला सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर पेल्हार पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या तरुणाचा शोध सुरू केला. पोलिसांनी चार आरोपींना अटक करून ५ तलवारी, ४ खंजीर, १८ कोयते एक बोलेरो पिकअप असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पुण्यामध्ये कोयता घेऊन दहशत माजवून हल्ला करणारी कोयता गॅंग सक्रीय असताना वसईत तलवार गॅग सक्रीय झाली आहे. संतोषभुवन, विशाल पांडे नगर परिसरात एक तरुण तलवार घेऊन दहशत माजवत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा तरुण तलवार दाखवून परिसरातील लोकांना धमकावत असल्याचे व्हिडीओत दिसून येत आहे. या व्हिडीओतील दोघांची ओळख पटवून पेल्हार पोलिसांनी तलवार घेऊन दहशत माजविणार्या आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली. याप्रकरणी साहिल काश्मीर सरवा, विनोद सुनेरा नागर, डॉन उर्फ कुलदीपसिंग रमेशसिंग व राजवीरसिंग पवनसिंग या चार जणांना ताब्यात घेतले आहे. या आरोपींकडून ५ तलवारी, ४ खंजीर, १८ कोयते एक बोलेरो पिकअप असा ३ लाख ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पेल्हारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी लोकमतला दिली आहे. या आरोपी विरोधात शुक्रवारी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.