वेगळीच खेळी! एकाला एबी फॉर्म, तर दुसऱ्याला एबीफॉर्मसह जिल्हाध्यक्षांचे पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:04 IST2026-01-02T13:02:20+5:302026-01-02T13:04:34+5:30
...यामुळे इच्छुकांचे इतरत्र जाण्याचे मार्ग तर बंद झालेच मात्र पक्षाचा एबी फॉर्म मिळूनही ते अपक्ष ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.

प्रतिकात्मक फोटो...
मीरारोड : भाजपने काहींना उमेदवारीसाठी पक्षाचा एबी फॉर्म दिला, त्यामुळे उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण होते, मात्र तासाभरातच पक्षाने दुसऱ्या उमेदवाराला एबी फॉर्म देत आधी फॉर्म दिलेल्या उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरू नये, अशा आशयाचे पत्र त्यासोबत देत वेगळीच खेळी खेळल्याचे दिसून आले. यामुळे इच्छुकांचे इतरत्र जाण्याचे मार्ग तर बंद झालेच मात्र पक्षाचा एबी फॉर्म मिळूनही ते अपक्ष ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.
प्रभाग १८ मधील भाजप माजी नगरसेवक विजय राय यांना शेवटच्या दिवशी दुपारी एबी फॉर्म दिला. मात्र त्यानंतर विवेक उपाध्याय यांनाही एबी फॉर्म दिला. सोबत भाजपकडून पत्र देऊन राय यांचा एबी फॉर्म ग्राह्य धरू नये व उपाध्याय यांचा फॉर्म अधिकृत समजावा अशा आशयाचे पत्र देऊन राय यांचा पत्ता कापला गेला. शेवटच्या क्षणी हा प्रकार घडल्याने राय यांना अन्य पक्षाची उमेदवारी मिळवण्याचे मार्ग बंद झाले.