देशात अंधार पसरतो तेव्हा महाराष्ट्रच प्रकाश करतो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 17:41 IST2024-11-15T17:40:16+5:302024-11-15T17:41:16+5:30
कन्हैय्या कुमार: शेखर शेंडे यांच्या प्रचारार्थ सेलूत सभा

When darkness spreads in the country, Maharashtra shines the light
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : या देशाच्या विकासात काँग्रेसचे मोठे योगदान राहिले आहे. काँग्रेसविना या देशाचा इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. जेव्हा देशात अंधार पसरतो तेव्हा महाराष्ट्रच प्रकाश करतो. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठबळ द्या, असे आवाहन कन्हैय्या कुमार यांनी केले.
महाविकास आघाडीचे वर्धा विधानसभेचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शेखर शेंडे यांच्या सेलूतील प्रचारसभेत ते बोलत होते. या सभेला उमेदवार शेखर शेंडे, माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, शैलेश अग्रवाल, अभ्युदय मेघे, प्रवीण हिवरे, समीर देशमुख, अनिल देवतारे, अविनाश काकडे, महेंद्र मुनेश्वर, उद्धवसेनेचे बाळू मिरापूरकर, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे, सेलूच्या नगराध्यक्ष स्नेहल देवतारे यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी कन्हैय्या कुमार यांनी सुरुवातीपासून सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांकरिता शिक्षणाची सुविधा केली नसती तर कल्पना चावला झाली नसती. त्यामुळे शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. शिक्षणाशिवाय परिवर्तन अशक्य आहे. देशात संविधान बदलण्याचे षड्यंत्र रचले जात आहे; पण एकमत देशात एकता घेऊन आले आहे, हेही विसरून चालणार नाही.
५०-५० कोटी रुपये घेऊन सत्तेत बसणारे गद्दार आहेत, त्यांना धडा शिकविणारी ही निवडणूक आहे. या काळात विकासाच्या बाता केल्या जात आहेत. एकीकडे महागाई वाढली; पण शेतमालाचे भाव वाढले नाहीत. शेतकरी, शेतमजूर, युवकांसमोरील बेरोजगारी यांवर बोलायचे सोडून सत्ताधारी धर्माच्या गोष्टी करतात. त्यामुळे आता निवडणुकीतून हरविलेले मुद्दे जागृत करण्याची गरज आहे. असेही कन्हैय्या कुमार म्हणाले.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास विकासाचा नवा अध्याय सुरू होईल. महिलांना प्रतिमहा तीन हजार, शंभर टक्के प्रवास सवलत, युवकांच्या हातांना काम, बेरोजगारांना दरमहा चार हजार रुपयांचा भत्ता देणार तसेच शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतची कर्जमाफी व प्रत्येक कुटुंबाला २५ लाखांचा विमा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन करून काँग्रेसचे हात बळकट करण्याचे आवाहन केले.
ही सर्वसामान्यांच्या हिताची लढाई : शेखर शेंडे
सध्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, युवकांच्या हाताला काम नाही, महिला सुरक्षित नाहीत, तर सर्वसामान्यांना सुखाने जगता येत नाही, अशी परिस्थिती या दहा वर्षात सत्ताधाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ उमेदवार किवा पक्षाची नसून ही सर्वसामान्यांच्या हिताची, सर्वाच्या अस्तित्वाची लडाई असून आपण सर्वांनी एकजुटीने ही लढ्या आणि जिंकूया, असे मत शेखर शेंडे यांनी यावेळी व्यक्त केले.