वर्धा जिल्ह्यात पाणीसंकट; नागरिकांना प्यावे लागणार स्वखर्चातून पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 17:54 IST2025-05-07T17:53:35+5:302025-05-07T17:54:05+5:30
पाणीपुरवठा विभाग झाला सज्ज : जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून नियोजन

Water crisis in Wardha district; Citizens will have to drink water at their own expense
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यंदा उन्हाळ्यात सूर्य चांगलाच आग ओकत आहे. उन्हाचा पारा ४२ ते ४४ अंश सेल्सिअसमध्ये खेळत आहे. प्रकल्प व विहिरीच्या जलपातळीत सातत्याने घट होत आहे. नदी-नाल्यांना मार्चअखेरीस कोरड पडली आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी पायपीट करावी लागू नये, यासाठी जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने हाती घेतलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू आहे.
विहीर अधिग्रहणावर भर असल्याने प्रशासनाला पाण्यासाठी खिसा रिकामा करावा लागणार आहे. यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याचीही समस्या निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सार्वजनिक विहिरी, बोअरवेल व कूपनलिका कोरड्या झाल्याने त्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच गावांमध्ये पाण्यासाठी पायपीट केली जात आहे. त्यामुळे या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील पाच तालुक्यातील पाच तालुक्यांत विहिरींचे अधिग्रहण केले असून, पाणी संकटावर मात करण्याचा प्रयत्न केला जात असून जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभागही सज्ज झालेला आहे.
कोणत्या प्रकल्पात किती साठा?
प्रकल्प सध्याचा साठा
मदन उन्नई धरण ५३.००
निम्न वर्धा ५२.६९
लाल नाला ४८.९०
धाम प्रकल्प ३८.३५
बोर प्रकल्प ३८.०८
सुकली लघु २८.८८
पंचधारा प्रकल्प २७.०९
वर्धा कार नदी २१.६०
डोंगरगाव प्रकल्प २०.८६
मदन प्रकल्प १४.३९
पोथरा प्रकल्प ०९.१३
३३ विहिरींचे केलेय अधिग्रहण
आठ तालुक्यांपैकी पाच तालुक्यात पाणीटंचाई लक्षात घेता ३३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. आगामी काळात आवश्यकता पडल्यास तरतूद करण्याचीही तयारी प्रशासनाची आहे.
मे महिना कसा काढणार?
प्रकल्प व विहिरीतील जलसाठ्यात उष्णतेमुळे कमालीची घट होत आहे. नदी-नाले कोरडे पडले आहेत. प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी होत आहे. पशुधनाला पिण्यासाठी पाणी नसल्याने पायपीट करावी लागत आहे. त्यासाठी मजुरीवरही पाणी फेरावे लागत आहे. उन्हाचा पारा वाढत असल्याने मे महिना कसा काढायचा, असा प्रश्न नागरिकांना पडला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
टंचाई कृती आराखडा नेमका किती कोटींचा ?
गावांना पाणी टंचाईचा सामना करावा यावर्षी जवळपास ५०१ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ८ तालुक्यातून पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने संभाव्य पाणीटंचाईचा १९ कोटी ७६ लाख ३२ हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे.