झाडाच्या आडोशाला उभे राहिलेल्या दोन सख्ख्या चुलत भावंडांचा वीज कोसळून मृत्यू

By रवींद्र चांदेकर | Updated: June 26, 2025 16:15 IST2025-06-26T16:12:46+5:302025-06-26T16:15:15+5:30

कारंजा शहरावर शोककळा : शेतात कोसळली वीज

Two cousins die after being struck by lightning while standing under a tree | झाडाच्या आडोशाला उभे राहिलेल्या दोन सख्ख्या चुलत भावंडांचा वीज कोसळून मृत्यू

Two cousins die after being struck by lightning while standing under a tree

कारंजा (घा.) (वर्धा) : अख्खे मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर गुरुवारी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. कारंजा (घाडगे) तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यात वीज कोसळून दोन सख्खे चुलत भाऊ शेतात जाताना गतप्राण झाले. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास चंदेवाणी रस्त्यावर घडली.

रितेश मोरेश्वर सरोदे (२०) आणि राजेश ताराचंद सरोदे (१५, दोघेही रा. कारंजा) अशी मृतांची नावे आहेत. गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास कारंजा शहर आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. सध्या सर्वत्र पेरणीची लगबग सुरू आहे. मोरेश्वर सरोदे यांच्या कारंजापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतामध्ये कपाशीची लागवड सुरू होती. शेजारी, परिसरातील महिला, तरुण मुलांसह मजूर व मोरेश्वर सरोदे यांचा मुलगा रितेश आणि पुतण्या राजेश शेतात कपाशीची लागवड करीत होते. दुपारी १ वाजताच्या सुमारास शहरासह परिसरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे रितेश, राजेश आणि मजूर शेतातील झाडांच्या साहाय्याने उभे होते. अचानक जोराची वीज कडाडली आणि निंबाच्या झाडाखाली उभ्या असलेल्या रितेश व राजेश सरोदे यांच्या अंगावर पडली. त्यात ते जागीच ठार झाले.

मजूर दुसऱ्या झाडाखाली, राजेश एकुलता एक मुलगा
शेतातील इतर मजूर हे मृतक रितेश व राजेश ज्या झाडाखाली उभे होते, त्यांच्यापासून ३५ ते ४० फूट अंतरावरील दुसऱ्या झाडाखाली उभे होते. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. रितेश आणि राजेशच्या मृत्यूमुळे संपूर्ण कारंजा शहरावर शोककळा पसरली आहे. मृतक राजेश हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.

Web Title: Two cousins die after being struck by lightning while standing under a tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.