गांधी जिल्ह्याच्या खासदाराचा आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 20:48 IST2019-05-22T20:46:43+5:302019-05-22T20:48:29+5:30
मतदान होऊन १ महिना ११ दिवसांनंतर मतमोजणी होऊ घातली आहे. गेल्या सव्वा महिन्यात मोठ्या प्रमाणावर निवडणुकीतील निकालावरून चर्चेची रणधुमाळी रंगली. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपला उमेदवार विजयी होण्याचा दावा केला आहे.

गांधी जिल्ह्याच्या खासदाराचा आज फैसला
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मतदान होऊन १ महिना ११ दिवसांनंतर मतमोजणी होऊ घातली आहे. गेल्या सव्वा महिन्यात मोठ्या प्रमाणावर निवडणुकीतील निकालावरून चर्चेची रणधुमाळी रंगली. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपला उमेदवार विजयी होण्याचा दावा केला आहे.
काँग्रेसला हिंगणघाट व देवळी, पुलगाव या दोन मतदारसंघात आघाडी मिळण्याची आशा आहे. शिवाय, दलित, मुस्लिम व कुणबी समाजाची गठ्ठा मते मिळाल्याने काँग्रेसचा विजय सुनिश्चित असल्याचा दावा करण्यात येत आहे, तर भाजपनही सर्वच मतदार संघात पक्षाला आघाडी मिळेल, असा दावा केला आहे. मोर्शी या विधानसभा क्षेत्रात भाजपला सर्वाधिक मताधिक्याची आशा आहे. काही लोक भाजप विजयी उमेदवाराचे मताधिक्य ६० हजार ते १ लाखापर्यंत राहील, असा दावा करीत आहे. तर काही लोक वर्धा मतदारसंघात खूपच काट्याची लढत झाल्याचे सांगत आहेत. बहुजन समाज पक्षाला किमान १ लाखावर मते मिळतील काय, याबाबतही चर्चा आहे. हत्तीची मते काँग्रेसने खेचून नेली, असा दावा काँग्रेस करीत आहे. या विधानसभा मतदारसंघात भाजपचे ३ व काँग्रेसचे ३ आमदार आहेत. त्यामुळे त्या-त्या विधानसभा मतदारसंघात आघाडीची उमेदवारांना आशा आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या २ ते ३ एक्झिट पोलने भाजप तर एका एक्झिट पोलने काँग्रेस विजयी होईल, असा दावा केला आहे. या परिस्थितीत मतमोजणीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र, मतमोजणीनंतरच निकाल कळेल.