कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; पुनर्वसीत गावातील दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 18:01 IST2024-10-28T17:54:20+5:302024-10-28T18:01:33+5:30
Vardha : रुद्रापूर गावातील घटनेने खळबळ

Tired of being indebted, the farmer committed suicide by jumping into the well
लोकमत न्यूज नेटवर्क
साहूर : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने विहिरीत उडी घेत जीवन संपविले. ही दुर्दैवी घटना नजीकच्या रुद्रापूर गावात उजेडात आली. या घटनेने सावंगी पुनर्वसन गावात शोकाकुल वातावरण होते.
नंदकिशोर वासुदेव डहाके (४१) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. नंदकिशोर याच्याकडे अडीच एकर शेती आहे. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून गेले होते. हताश होत ते २५ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घरातून निघून गेले होते. उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांचा शोध घेतला असता २७ रोजी सकाळी रुद्रापूर येथील मारोतराव लवणकर यांच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेहच तरंगताना दिसून आला. याची माहिती सरपंच विनोद सोनोने यांनी आष्टी पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कारंजा येथील रुग्णालयात पाठविला. मृतक नंदकिशोरवर साहूर येथील बँक ऑफ इंडियाचे १ लाख ३० हजार रुपयांचे कर्ज होते.
त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुले, असा बराच मोठा परिवार आहे. पुढील तपास बालाजी सांगळे, बावणे, युवराज चोरे करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.