सततच्या नापिकीला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या; विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2022 14:05 IST2022-10-29T14:05:20+5:302022-10-29T14:05:55+5:30
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने त्यांच्या संकटात आणखीच भर घातली.

सततच्या नापिकीला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या; विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन
साहूर (वर्धा) : सततची नापिकी आणि यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने हताश झालेल्या अल्पभूधारक वृद्ध शेतकऱ्याने घरालगतच्या सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना साहूर येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
मधुकर टिकाराम गणेसर (८५, रा. साहूर) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे चार एकर कोरडवाहू शेती असून पत्नी, दोन मुले, स्नुषा व नातवंड असा परिवार आहे. मधुकर यांचे आयुष्यच संघर्षमय राहिलं आहे. अल्प शेतीमध्ये कष्ट करून ते संसाराचा गाडा हाकत होते. पण, सातत्याने नापिकीचा सामना त्यांना करावा लागला. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने त्यांच्या संकटात आणखीच भर घातली. त्यामुळे कर्जाऊ घेतलेल्या रकमेची परतफेड कशी करावी आणि दैनंदिन खर्च कसा भागवावा, या विवंचनेत असलेल्या मधुकर यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला.
गुरुवारी रात्रीला घरातील मंडळी झोपलेली असताना मधुकर यांनी घरालगतच्या सार्वजनिक विहिरीत उडी घेतली. मधुकर हे घरी नसल्याचे लक्षात येताच कुटुंंबीयांनी शोधाशोध केली असता त्यांची काठी व चप्पल विहिरीजवळ आढळून आली. गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेऊन गर्दी केली. आष्टी पोलिसांना याची माहिती मिळताच ठाणेदार लक्ष्मण लोकरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक नबी शेख, बीट जमादार गजानन वडनेरकर, परकोट यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीकरिता आर्वीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास ठाणेदार लोकरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.