वर्धा मतदारसंघातून आतापर्यंत ११ जणांना मिळाला खासदारकीचा मान, दोघांची हॅट्ट्रिक

By रवींद्र चांदेकर | Published: March 28, 2024 04:44 PM2024-03-28T16:44:27+5:302024-03-28T16:45:19+5:30

आता अठराव्या लोकसभेसाठी निवडणूक होत असून, विद्यमान खासदारांना हॅट्ट्रिकची संधी आहे.

So far, 11 people have got the honor of MP from Wardha Constituency, two have a hat trick | वर्धा मतदारसंघातून आतापर्यंत ११ जणांना मिळाला खासदारकीचा मान, दोघांची हॅट्ट्रिक

वर्धा मतदारसंघातून आतापर्यंत ११ जणांना मिळाला खासदारकीचा मान, दोघांची हॅट्ट्रिक

वर्धा : आतापर्यंत १७ वेळा लोकसभा निवडणूक झाली. त्यात ११ जणांना खासदारकीचा मान मिळाला. त्यापैकी दोघांनी हॅट्ट्रिक केली, तर दोघांना दोनदा खासदारकीची संधी मिळाली. आता अठराव्या लोकसभेसाठी निवडणूक होत असून, विद्यमान खासदारांना हॅट्ट्रिकची संधी आहे.

१९५२ पासून देशात लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली. पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे श्रीमन्न अग्रवाल यांनी विजयश्री प्राप्त केली होती. त्यानंतरच्या निवडणुकीत कमलनयन बजाज खासदार झाले. त्यांनी १९५७ पासून १९७१ पर्यंत सलग तीनदा लोकसभेत वर्धेचे नेतृत्व केले. १९७१ ते १९७७ पर्यंत जगजीवनराव कदम, १९७७ ते १९८० पर्यंत संतोषराव गोडे यांनी खासदारकी भूषविली. त्यानंतर १९८० पासून १९९१ पर्यंत सलग तीनदा वसंतराव साठे यांना खासदारकीची संधी मिळाली. मात्र, १९९१ च्या निवडणुकीत प्रथमच काँग्रेसचा पराभव झाला. त्यावेळी वसंतराव साठे यांचा पराभव करून कम्युनिस्ट पक्षाचे रामचंद्र घंगारे यांना मतदारांनी खासदारकी बहाल केली होती.

यानंतर १९९६ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे विजयराव मुडे, तर १९९८ च्या निवडणुकीत काँग्रेसचे दत्ता मेघे यांना खासदारकीची संधी मिळाली. १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रभा राव, तर २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे सुरेश वाघमारे यांना मतदारांनी संधी दिली. त्यानंतर २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत मतदारांनी दुसऱ्यांदा काँग्रेसचे दत्ता मेघे यांना विजयी केले. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत मतदारांनी भाजपचे रामदास तडस यांना सलग दोनदा खासदारकीची संधी दिली आहे. आता ते तिसऱ्यांदा मैदानात उतरले आहे. दत्ता मेघे यांना तब्बल दहा वर्षांच्या ब्रेकनंतर, तर रामदास तडस यांना सलग दोनदा खासदारकीची संधी मिळाली आहे.

आईचा विजय, मुलगी पराभूत

वर्धा लाेकसभा मतदारसंघातून मतदारांनी एका महिलेलाही खासदारकीची संधी दिली. काँग्रेसच्या प्रभा राव यांच्या रूपाने पहिल्यांदाच येथून २००४ मध्ये एका महिलेला खासदारकीची संधी मिळाली. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत त्यांच्या कन्या चारुलता टोकस (राव) यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. मात्र, भाजपचे उमेदवार रामदास तडस यांनी त्यांचा पराभव केला. त्या निवडणुकीत तडस यांना पाच लाख ७८ हजार ३६४, तर टोकस यांना तीन लाख ९१ हजार १७३ मते मिळाली होती. त्यावेळी रिंगणातील शैलेश अग्रवाल यांना ३६ हजार ४२३, तर धनराज वंजारी यांना ३६ हजार ४५२ मते मिळाली होती.
 

Web Title: So far, 11 people have got the honor of MP from Wardha Constituency, two have a hat trick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.