अमृत ट्रेडर्सवर छापा; ३६ हजारांचा गुटखा जप्त, आरोपीस अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 18:15 IST2023-06-22T13:04:41+5:302023-06-22T18:15:14+5:30
उपविभागीय पोलिस पथकाची कारवाई

अमृत ट्रेडर्सवर छापा; ३६ हजारांचा गुटखा जप्त, आरोपीस अटक
वर्धा : रेल्वेस्थानक समोरील रस्त्यावर असलेल्या अमृत ट्रेडर्समध्ये पोलिसांनी छापा मारुन गोदामातून प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू व गुटखा असा ३६ हजार ९३६ रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एका आरोपीस अटक करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलिस पथकाने २० रोजी केली. अमर मुलचंद गेलानी (४५) रा. दयालनगर असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर नवीन सुरेशकुमार आहुजा रा. दयालनगर हा फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत.
रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यालगत असलेल्या अमृत ट्रेडर्स दुकानात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी दुकानावर छापा मारला असता आरोपी अमर मुलचंद गेलानी याच्या गोदामातून सुगंधित तंबाखूने भरून असलेले सीलबंद असलेले ५४ पाकिटे, सुगंधित पान मसाला (गुटखा) चे ४८ पॅकेट आदी असा ३६ हजार ९३६ रुपयांचा गुटखा जप्त केला.
पान मटेरियल, गुटखा, सुगंधित तंबाखू त्याने नवीन सुरेशकुमार आहुजा याच्याकडून आणल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपी अमर गेलानी याला अटक केली तर नवीन आहुजा याचा शोध पोलिस घेत आहेत. दोघांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक परवेज खान, संजय गायकवाड, अमर लाखे, पवन निलेकर, समीर शेख, मंगेश चावरे, प्रमोद वाघमारे, राजू वैध, संदीप अलोणे, किरण गेडाम, अन्न सुरक्षा अधिकारी राजेश यादव, अमित तृपताने यांनी केली.