‘ऑपरेशन सतर्क’; अंदमान एक्सप्रेसमध्ये पकडला मद्यसाठा
By चैतन्य जोशी | Updated: June 10, 2023 15:05 IST2023-06-10T15:05:19+5:302023-06-10T15:05:43+5:30
आरपीएफची कारवाई : अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

‘ऑपरेशन सतर्क’; अंदमान एक्सप्रेसमध्ये पकडला मद्यसाठा
वर्धा : रेल्वेतून होणाऱ्या दारुवाहतुकीबाबत रेल्वे सुरक्षा बल सतर्क झाला असून दारु तस्करी करणाऱ्यांविरुद्ध ‘ऑपरेशन सतर्क’ अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत सेवाग्राम स्थानकावर अंदमान एक्सप्रेसची तपासणी केली असता एस ३ कोचमध्ये दोन बॅग संशयास्पद आढळून आल्या. जवानांनी बॅगची तपासणी केली असता विदेशी दारुसाठा मिळून आला. लोहमार्ग पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
आरपीएफ नागपूर मंडळाचे सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या निर्देशानुसार रेल्वे सुरक्षा बलातर्फे ‘ऑपरेशन सतर्क’ राबविण्यात आले. पोलिस निरीक्षक आर.एस. मीना, उपनिरीक्षक दत्त इबितवार, प्रधान आरक्षक दहिने, आरक्षक मुस्ताक यांच्या पथकाने रेल्वेतून होणाऱ्या दारु तस्करीबाबत कार्यवाही करीत असतानाच गाडी क्रमांक १६०३२ अंदमान एक्सप्रेस सेवाग्राम रेल्वेस्थानकावर आली असता आरपीएफ जवानांनी तपासणी केली असता एस ३ कोचमध्ये दोन ट्राॅली बॅग बेवारसरित्या आढळून आल्या.
जवानांनी बॅगची तपासणी केली असता विदेशी दारुच्या बाटल्या आढळून आल्या. जवानांनी ३९ हजार ८०० रुपयांचा दारुसाठा जप्त करुन लोहमार्ग पोलिसांना गुन्ह्याचा तपास सोपविण्यात आला. पोलिसांनी फरार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.