समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली; महिला ठार, दोघे गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 12:42 IST2023-02-16T12:39:45+5:302023-02-16T12:42:27+5:30

केळझर नजीकच्या किन्हाळा शिवारातील घटना

one killed, two seriously as Car overturns on Samriddhi Highway at Kinhala Shivara near Keljhar | समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली; महिला ठार, दोघे गंभीर

समृद्धी महामार्गावर भरधाव कार उलटली; महिला ठार, दोघे गंभीर

सेलू (घोराड) : समृद्धी महामार्गावर भरधाव कार अनियंत्रित उलटली. या अपघातात कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास केळझर नजीकच्या किन्हाळा शिवारात झाला. पूजा प्रेमचंद दरवळकर (२५) असे मृत महिलेचे नाव असून अनुप राऊतकर व अरुणा राऊतकर असे गंभीर जखमीचे नाव आहे.

मामेबहिणीच्या लग्नाला उपस्थिती दर्शविण्यासाठी पूजा दरवळकर, अनुप राऊतकर व अरुणा राऊतकर हे नागपूर येथे गेले होते. ते एम. एच. २७ ए.सी. ७९४७ क्रमांकाच्या कारने धामणगावच्या दिशेने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाने परतीचा प्रवास करीत होते. भरधाव कार केळझर नजीकच्या किन्हाळा शिवारात आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशातच वाहन थेट उलटले. यात पूजा याचा मृत्यू झाला तर अनुप व अरुणा हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सेलू पोलिस ठाण्याचे जमादार मनोहर मुडे व अमोल राऊत यांनी अपघातस्थळ गाठून जखमींना रुग्णालयाकडे रवाना केले. या अपघाताची नोंद सेलू पोलिसांनी घेतली आहे.

वाहनाचा झाला चुराडा

भरधाव कार अनियंत्रित होत उलटली. हा अपघात केळझर नजीकच्या किन्हाळा शिवारात समृद्धी महामार्गावर झाला. हा अपघात इतका भीषण होता की अपघातग्रस्त कारचा चुराडा झाला आहे.

Web Title: one killed, two seriously as Car overturns on Samriddhi Highway at Kinhala Shivara near Keljhar