कार अपघातात मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू; तीन जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 14:08 IST2021-06-05T14:05:48+5:302021-06-05T14:08:19+5:30
Accident News : भरधाव कार उषा दाते यांच्या शेताजवळील वळण रस्त्यावर आली असता वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.

कार अपघातात मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू; तीन जण जखमी
चिकणी (जामणी)(वर्धा) - भरधाव कार अनियंत्रित होऊन थेट पुलाखाली कोसळल्याची घटना घडली आहे. यात मंडळ अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील तीन व्यक्ती जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास दहेगाव (गावंडे) शिवारातील वळण रस्त्यावर झाला. मिळालेल्या माहितीनुसार, एम.एच.०५ ए. एस. ५४६५ क्रमांकाच्या कारने मंडळ अधिकारी बाबाराव हिम्मत पांडे (५६), सुनील नारायण घोडे, सुयोग ओमप्रकाश कांबळे व मोहम्मद शफी शेख इसुफ हे चौघे वायफडकडून दहेगावकडे जात होते.
भरधाव कार उषा दाते यांच्या शेताजवळील वळण रस्त्यावर आली असता वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना कार थेट नाल्याच्या पुलावरून खाली कोसळली. यात मंडळ अधिकारी बाबाराव पांडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुनील घोडे व सुयोग कांबळे हे गंभीर जखमी झाले. तसेच मोहम्मद शफी शेख इसुफ हे किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सावंगी पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेत जखमींना तातडीने रुग्णालयाकडे रवाना केले. या अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली आहे.