शिंदे-फडणवीस सरकार वोक्के, पण जनतेचे जीवन झाले फिक्के; वर्ध्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा हल्लाबोल
By अभिनय खोपडे | Updated: September 1, 2022 18:15 IST2022-09-01T17:55:53+5:302022-09-01T18:15:14+5:30
वर्धेच्या छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

शिंदे-फडणवीस सरकार वोक्के, पण जनतेचे जीवन झाले फिक्के; वर्ध्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा हल्लाबोल
वर्धा : ऐन सनासुदीच्या काळात महागाईने उच्चांक गाठला आहे. सामान्य जनता साध जीवन जगण्यासाठी संघर्ष करत आहे. असे असतांना नव्याने आलेलं शिंदे-फडणवीस सरकार केवळ उत्सवात दंग असून, पोकळ घोषणा करीत आहे. याच्या निषेधार्थ आज (दि. १) वर्धेच्या छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
वर्धा जिल्हा हा पूरग्रस्त असून शेतकरी विजेच्या तार तोंडात घेवून, नदीत उडी मारून आत्महत्या करीत आहे. पण या खोकेबहाद्दर सरकारला, व त्यांच्या आमदार खासदार यांना मात्र स्वत:च्या मंत्रिपदाच्या भाऊगर्दित फुर्सत नाही. पन्नास खोके, शिंदे सरकार वोक्के, महागाईकडे दुर्लक्ष करणार्या शिंदे भाजप सरकारचा निषेध असो, अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिल्या.
राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, यांनी राष्ट्रवादी जिल्हा काॅंग्रेसचे अध्यक्ष सुनिल राऊत व युवकचे अध्यक्ष संदीप किटे यांचे नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. नवे शिंदे-फडणवीसांचे हे खोके सरकार केवळ आश्वासन देणारे सरकार आहे. मेट्रो, गुजरातची मेट्रो ट्रेन, विविध स्मारके यांचेसाठी हजारो कोटी खर्च करण्यासाठी यांच्याजवळ पैसे आहेत. पण सामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी मात्र उपाय नाहीत, उपाययोजना नाहीत.
शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांच्या पुस्तक पेनवर कर लावणार हे भाजपचं सरकार, आतापर्यंत देशातील व महाराष्ट्रातील अतिशय नालायक व जनविरोधी सरकार आहे. शेतकर्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेवून, शपथ देवून आत्महत्या करू नका, असा उपदेश देणारे मुख्यमंत्री फक्त नौटंकी करून, केवळ आपल्या पक्षाच्या आमदारांना हजारो कोटी वाटत आहेत आणि शेतकर्यांना वार्यावर सोडत आहे, असे आरोप करत शिंदे व फडणवीस सरकारचा राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने, जाहीर निषेध करण्यात आला.