Maharashtra Nagar Parishad Election Result : वर्ध्यात भाजपची शतकी पारी ! काँग्रेसला किती मिळाल्या जागा, नगराध्यक्ष कुणाचे?
By रवींद्र चांदेकर | Updated: December 21, 2025 19:16 IST2025-12-21T19:15:30+5:302025-12-21T19:16:29+5:30
Wardha : जिल्ह्यातील सहापैकी तीन नगराध्यक्षपदांवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र, नगरसेवकपदांच्या १६६ पैकी तब्बल १०० जागा जिंकून भाजपने आपणच जिल्ह्यात मोठा भाऊ असल्याचे दाखवून दिले आहे.

Maharashtra Nagar Parishad Election Result: BJP's century innings in Wardha! How many seats did Congress get, whose mayor is it?
वर्धा : जिल्ह्यातील सहापैकी तीन नगराध्यक्षपदांवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र, नगरसेवकपदांच्या १६६ पैकी तब्बल १०० जागा जिंकून भाजपने आपणच जिल्ह्यात मोठा भाऊ असल्याचे दाखवून दिले आहे. काँग्रेसने दोन नगराध्यक्षपदांसह नगरसेवकांच्या २५ जागा जिंकून पक्ष अद्याप जिल्ह्यात बाळसे धरून असल्याचे सिद्ध केले आहे. जिल्ह्यात वर्धा आणि देवळी येथील ‘हाय होल्टेज’ निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
या दोन्ही ठिकाणी भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. वर्धेत पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार नीलेश किटे यांच्यासह ४० जागांवरील उमेदवारांच्या विजयासाठी जिवाचे रान केले होते. देवळीत माजी खासदार रामदास तडस यांच्या सौभाग्यवती नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या. त्यांच्यासाठी रामदास तडस यांच्यासह आमदार राजेश बकाने यांनी परिश्रम घेतले. मात्र, या दाेन्ही ठिकाणी मतदारांनी नगराध्यक्षपदी अनुक्रमे काँग्रेसचे सुधीर पांगुळ आणि अपक्ष किरण ठाकरे यांना संधी दिली आहे. आपल्या विधानसभा मतदारसंघातील पुलगाव येथेही आमदार राजेश बकाने यांना झटका बसला. तेथे काँग्रेसने २० पैकी १० जागा बळकावून नगराध्यक्षपदावरही विजय मिळविला. वर्धा आणि देवळी विधानसभा मतदारसंघात भाजपाला चांगलाच फटका बसला आहे. मात्र, वर्धा आणि देवळी या दोन्ही ठिकाणी नगरसेवकपदांवर भाजपने दणदणीत विजय मिळविला आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी नूतन नगराध्यक्षांची कोंडी होण्याची शक्यता आहे.
हिंगणघाट, आर्वी, सिंदीचा गड राखला
भाजपाने हिंगणघाट, सिंदी रेल्वे आणि आर्वी येथे आपला गड कायम राखला आहे. या तीनही ठिकाणी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले आहे. सोबतच बहुमताने नगरसेवकही निवडून आले आहे. हिंगणघाटमध्ये जिल्ह्यात भाजपाचे सर्वाधिक २७ आणि एक सर्मथक उमेदवार विजयी झाला आहे. सोबतच महायुतीमधील आरपीआय (आठवले) गटाचे दोन उमेदवार विजयी झाले आहे. तेथे महायुतीच्या पारड्यात ४० पैकी तब्बल ३० जागा पडल्या आहे.
काका-पुतण्याचे अस्तित्व कायम, उद्धवसेना तग धरून, शिंदेसेना भुईसपाट
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी आपले अस्तित्व कायम राखले आहे. सोबतच उद्धवसेनाही तग धरून आहे. त्याचबरोबर माकपचा एकमेव उमेदवार विजयी झाला आहे. त्यामुळे माकपनेही अद्याप पक्ष तग धरून असल्याचे दाखवून दिले आहे. या पक्षांसोबत आठ अपक्षांनीही विजय मिळवून सर्वच पक्षांना धडा शिकवला आहे. मात्र, पालिकेच्या रणसंग्रमात शिंदेसेना पुरती भुईसपाट झाली आहे.
सर्व पक्षांना मिळालेल्या एकूण जागा
- भाजप १००
- काँग्रेस २५
- राष्ट्रवादी शरद पवार गट १९
- राष्ट्रवादी अजित पवार गट ८
- अपक्ष ८
- उद्धवसेना ३
- आरपीआय (आठवले) २
- माकप १
- एकूण १६६