Maharashtra Flood : मित्राची गाडी वाचवण्याच्या नादात युवक बुडाला, व्हिडिओ झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 11:04 IST2021-07-25T11:04:29+5:302021-07-25T11:04:55+5:30
Maharashtra Flood : जिल्ह्यातील अशाच एका दुर्घटनेत दुचाकी वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीसह युवकही पुलावरुन वाहून गेला आहे. आपल्या मित्राने पुलावरील पाण्यातून गाडी घातल्यानंतर त्याला ती आवरणं शक्य होईना. त्यावेळी, पाठिमागे असलेला मित्र मित्राच्या मदतीला धावून आला.

Maharashtra Flood : मित्राची गाडी वाचवण्याच्या नादात युवक बुडाला, व्हिडिओ झाला व्हायरल
वर्धा - राज्यातील विविध भागात पावसाने हाहाकार घातला असून आत्तापर्यंत 112 जणांना जीव गेला आहे. कोकण, प.महाराष्ट्रात पूराने थैमान घातले असून आत्तापर्यंत 1.35 लाख नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. विदर्भातही पावसाची संततधार सुरूच असून अनेक नद्यांनी पाण्याची पातळी ओलांडली आहे. तर, गावातील ओढे, बंधारे पाण्याने भरल्याचं दिसून येत आहे. अशा परिस्थितीतही जीव धोक्यात घालून नागरिक पूल ओलांडण्याचा प्रयत्न करत आहेत.
जिल्ह्यातील अशाच एका दुर्घटनेत दुचाकी वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीसह युवकही पुलावरुन वाहून गेला आहे. आपल्या मित्राने पुलावरील पाण्यातून गाडी घातल्यानंतर त्याला ती आवरणं शक्य होईना. त्यावेळी, पाठिमागे असलेला मित्र मित्राच्या मदतीला धावून आला. त्याने मित्रासह गाडीला धरले आणि पाण्याच्या प्रवाहातून बाहेर निघण्यासाठी प्रयत्न सुरू केला. मात्र, थोडे पुढे जाताच पुन्हा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी मित्राच्या हातातून सटकली. त्यावेळी, पाठिमागील मित्राने गाडी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुचाकी गाडीसह तोही पुराच्या पाण्यात वाहून गेला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वर्धा - मोटारसायकल वाचविण्याच्या नादात वाहून गेला तरुण pic.twitter.com/EQ5fU1dZbE
— Lokmat (@MiLOKMAT) July 25, 2021
वर्धा जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यापेक्षा अधिक काळापासून दमदार पावसाची प्रतीक्षा होती. बुधवारी पहाटे सर्वदूर पावसाने हजेरी लावल्यानंतर गुरुवारी दुपारपासून सततधार कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मध्यम व मोठ्या जलाशयांची पाणी पातळी वाढल्याने नदी-नालेही फुगले आहे. समुद्रपूर तालुक्यातील पोथरा प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने वीस गावांचा संपर्क तुटला. यासोबतच जिल्ह्यातील इतरही जलाशयाची पातळी वाढल्याने पाटबंधारे विभागाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कोरा परिसरात गावांत शिरले पुराचे पाणी
- कोरा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून परिसरातील नदी, नाल्यांना दहा ते बारवेळा पूर आला आहे. लालनाप्रकल्पाचे पाणी सोडल्याने नदी, नाले ओसंडून वाहत आहे. त्यामुळे परिसरातील शेतासह गावातही पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुख्य रस्त्यांना तलावाचे स्वरुप प्राप्त झाल्याने येण्या-जाण्याचा मार्गही काही काळ बंद झाला होता.
वडगाव-पिंपळगाव मार्गावरील वाहतूक ठप्प
- समुद्रपूर तालुक्यातील पोथरा नदीला पूर आल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. सकाळी कामानिमित्य बाहेरगावी गेलेले नागरिकांना अलीकडच्या गावातच थांबावे लागले. वडगांव ते पिंपळगाव मार्गाची वाहतूक थांबली असून सायगव्हाण, सावंगी, लोखंडी व पिंपळगाव या गावाचा संपर्क तुटला. दोन व्यक्ती वाहून गेल्याने तहसीलदार राजू रणवीर, ना. तह. किरसान, ठाणेदार हेमंत चांदेवार व धमेंद्र तोमर शोध घेत आहे.