गणेशोत्सवातून वाढला रोजगार बाजारात लाखोंची उलाढाल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 14:34 IST2024-09-12T14:33:29+5:302024-09-12T14:34:31+5:30
Wardha : वाजंत्री, मंडप डेकोरेशन, केटरर्स, आचारी, व्यावसायिक, पुरोहित व्यस्त

Lakhs turnover in the employment market has increased from Ganeshotsav!
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : गणेशोत्सवाला शनिवारपासून सुरुवात झाली. जिल्ह्यात २५३ सार्वजनिक गणेशोत्सव, ७८ गावांत 'एक गाव, एक गणपती', तर १३ हजार १८५ घरी बाप्पा विराजमान झाले. यामुळे भाविकांत व बाजारात नवचैतन्य संचारले आहे. बाप्पाच्या आगमनाने रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या. व्यावसायिक, वाजंत्री, मंडप, डेकोरेशन, फळ, फूलविक्रेते, केटरर्स, आचारी, पुरोहित व्यस्त आहेत. विविध साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. गणेशोत्सवाच्या चार दिवसांत लाखोंची उलाढाल झाली आहे.
जिल्ह्यात गणेशोत्सव सुरु झाल्यापासून फूटपाथपासून मोठ्या व्यावसायिकांपासून सर्वांना अर्थप्राप्तीचे साधन प्राप्त झाले. अनेकांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटतो आहे. तसेच दोन पैसे गाठीशी बांधता यावे, यासाठी धडपड सुरू आहे. गणेशोत्सव सुरू होऊन चार दिवस लोटले; परंतु अद्यापही बाजारात गर्दी होत आहे. शहरात तीन दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला.
प्रत्येक घटकाला होतेय अर्थप्राप्ती
गणेशोत्सवानिमित्ताने मूर्तिकार, वाजंत्री, मंडप, डेकोरेशन, केटरर्स, आचारी, पुरोहित, फळ व फूल विक्रेते, किराणा, अन्य किरकोळ व फुटपाथ व्यावसायिक, मोठे व्यावसायिक तसेच उत्सवांशी निगडित प्रत्येक घटकाला अर्थप्राप्ती होत आहे. गणेशोत्सवात कलाकार, मंडप डेकोरेशन, नेपथ्यकार, वाद्यवृंद, हॉटेल, मेवा- मिठाई आदींच्या रोजगारात भर पडली आहे.
रोजगार व व्यवसायाला चालना देणारा उत्सव
जिल्ह्यात यंदा एकूण१३ हजार ४३८ गणेशमूर्तीची स्थापना झाली. ही संख्या गृहीत धरली तर या माध्यमातून होणारी उलाढाल सहजच लक्षात येते.
खरेदी-विक्री वाढल्याने व्यापारी व व्यावसायिकांत उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे रोजगार व व्यवसायास चालना मिळत आहे. सर्वांच्या उदरनिर्वाहाची चिंता बाप्पाच्या आगमनाने दूर झाली आहे.
खेळणी व खाद्यपदार्थांची रेलचेल
गणेशोत्सवानिमित्त मोदक, लाडू, केळी, काकडी, अन्य फळ, भेल, आइस्क्रीम, पाणीपुरी, चाट, डोसा, कॉर्न, पॉपकॉर्न, गोबी मंच्युरियन अश पदार्थाची मागणी वाढली आहे. राजस्थानी खेळणीची दुकाने सजली, तर बेन्टेक्स ज्वेलरी व्यवसायही जोमात आहे. पूजा साहित्यासह मिठाईच्या दुकानांत गर्दी होत असल्याचे चित्र सध्या बाजारपेठेत दिसून येत आहे.
एकता व बंधुभावाचे दर्शन
गणेशोत्सवातून एकता व बंधुभावाचे दर्शन होत आहे. यंदा 'सावंगीचा राजा' या प्रतिष्ठानने पर्यावरणपूरक मंदिराची प्रतिकृती, तर अनेक मंडळांनी विविध पर्यावरणपूरक देखावे व प्रतिकृतींचे सेट तसेच मंडप व लायटिंग डेकोरेशन डोळ्यांचे पारणे फेडणारे आहेत.