दुचाकी बरोबर चालव म्हणताच तरुणाच्या पाठीवर केले चाकूने वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 14:10 IST2023-01-11T14:08:52+5:302023-01-11T14:10:03+5:30
सावंगी पोलिसात तक्रार दाखल

दुचाकी बरोबर चालव म्हणताच तरुणाच्या पाठीवर केले चाकूने वार
वर्धा : दुचाकी बरोबर चालवता येत नाही का,असे म्हटले असता संतापलेल्या युवकाने त्याच्या दोन मित्रांना बोलावून तरुणाच्या पाठीवर चाकूने वार करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. ही घटना इंझापूर आरामशीन समोरील रस्त्यावर घडली. याप्रकरणी ९ रोजी सावंगी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
महेश देवानंद कांबळे हा त्याच्या मित्रांसह दुचाकीने कंपनीत कामावर जात होता. दरम्यान त्यांच्या दुचाकीसमोर चिडाम नामक युवकाने दुचाकी आणली. तेव्हा गोलू मसराम याने त्यास तुला दुचाकी बरोबर चालविता येत नाही काय,असे म्हटले असता चिडाम याने त्याच्या दोन मित्रांना बोलावून गोलू मसराम आणि महेश कांबळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. तसेच एकाने महेशच्या पाठीवर चाकूने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी सावंगी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.