महागडे मोबाइल चोरून बांगलादेशात नेऊन विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 18:42 IST2025-05-15T18:11:04+5:302025-05-15T18:42:12+5:30
एकास झारखंड येथून बेड्या : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Gang busted for stealing expensive mobile phones and taking them to Bangladesh for sale
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील बसस्थानक तसेच मार्केट परिसरात गर्दीचा फायदा घेत नागरिकांचे महागडे मोबाइल चोरीला जाण्याचे प्रकार सुरू होते. अशातच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सायबर सेलच्या मदतीने मोबाइल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. अट्टल मोबाइल चोरटा झारखंड येथे असल्याचे समजताच पोलिसांनी झारखंडमध्ये जाऊन आरोपीस बेड्या ठोकल्या. पोलिसी हिसका दाखवताच त्याने महाराष्ट्रातील विविध जिल्हे तसेच शहरातून चोरलेले महागडे मोबाइल बांगलादेश येथे विक्री करत असल्याचे सांगितले.
आर्यन नोनिया (रा. सी. पी. धारवा ऑफीस पारा, बारघेमो, बर्धमान, वेस्ट बंगाल) असे अटक केलेल्या अट्टल मोबाइल चोराचे नाव आहे. प्रकाश विनायक देशमुख (रा. आंजी) हे ११ रोजी बसने वर्धा येथे आले होते. गर्दीचा फायदा घेत चोरट्याने मोबाइल चोरला होता. याबाबतची तक्रार प्रकाश यांनी सायबर पोलिसांकडे दिली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सायबर पोलिसांच्या मदतीने तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान तांत्रिक बाबींचा वापर तसेच गोपनीय माहितीच्या आधारे मोबाइल चोरांची टोळी झारखंड राज्यातील महाराजपूर बाजार येथील असल्याचे समजले. पोलिसांनी झारखंड येथे जात रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्यास बेड्या ठोकल्या आहे. सध्या चोरटा पोलिसांच्या कोठीत आहे. त्याची कस्सून चौकशी केली जात आहे. तर इतर आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देखील रवाना झाल्याची माहिती आहे.
चोरटे नागपुरात राहून करायचे चोरीचे 'प्लॅनिंग'
अट्टल चोरटा आणि त्याचे इतर सहकारी नागपूर येथील प्रजापतीनगर, पार्डी येथे किरायाने खोली करून राहात होते. आरोपी चोरट्याविरूद्ध इतरही गुन्हे दाखल असून, तो आणखी एका गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. नागपूर येथे राहून बाजाराच्या दिवशी इतर जिल्ह्यात तसेच गाव शहरात जाऊन ते मोबाइल चोरी करत असल्याचे पोलिसांना चोरट्याने सांगितले. शहरासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याचा रेकॉर्ड देखील तपासण्याची आवश्यकता आहे. इतर शहरातही मोबाईल चोरीच्या घटना घडलेल्या असून त्या चोरींची देखील लिंक उघडण्याची शक्यता आहे.
रेल्वेगाडीतून जात होता झारखंडला मध्येच पकडला
चोरटा आर्यन रेल्वेगाडीतून झारखंड येथे जात असल्याचे पोलिसांना समजले. रेल्वे पोलिसांच्या मदतीने झारसुगुडा, ओरीसा येथे जात त्यास ताब्यात घेत अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या निर्देशात पोलिस निरीक्षक सुमंतराज भुजबळ, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते, विशाल डोनेकर, दिनेश बोथकर, मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, विशाल मडावी, अनुप कावळे, अंकित जिभे, रवी पुरोहित, अक्षय राऊत, गोविंद मुंडे, संघसेन कांबळे, सुमेध शेंद्रे, मिना कौरती यांनी केली असून तपास सुरु आहे.
सव्वा लाखांची रक्कम केली होती लंपास
प्रकाश यांनी दुसरे सीमकार्ड घेऊन मोबाइलमध्ये टाकले असता मोबाइलवर खात्यातून पैसे काढल्याचा मेसेज आला. बँकेला सतत सुट्या असल्याने बँकेत न जाता सायबर सेल गाठून तपासणी केली असता त्यांच्या खात्यातून भामट्याने परस्पर १,१६,५०० रुपयांची रक्कम काढल्याचे समजल्याने गुन्हा दाखल
केला होता.