अखेर फरार भूसंपादन अधिकारी पोलिसांच्या हाती, २ कोटी ६४ लाखांचा अपहारा

By आनंद इंगोले | Published: March 7, 2024 08:07 PM2024-03-07T20:07:26+5:302024-03-07T20:07:40+5:30

परभणीतून घेतले ताब्यात : न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला

fugitive land acquisition officer arrested by the police, fraud of 2 crore 64 lakhs | अखेर फरार भूसंपादन अधिकारी पोलिसांच्या हाती, २ कोटी ६४ लाखांचा अपहारा

अखेर फरार भूसंपादन अधिकारी पोलिसांच्या हाती, २ कोटी ६४ लाखांचा अपहारा

वर्धा: आधीच मोबदला उचलेल्या भूधारकांच्या नावे बोगस बँक खाते उघडून त्यांच्या नावे २ कोटी ६४ लाखांच्या अपहाराप्रकरणी तत्कालीन भूसंपादन अधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून त्या फरार असून पोलिस पथक त्यांच्या मागावर होते. अखेर १२ दिवसानंतर गुरुवारी वर्धा पोलिसांनी स्वाती सुर्यवंशी यांना हिंगोली येथील एका फार्महाऊसमधून ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. आता मुख्य आरोपीच पोलिसांच्या हाती लागल्याने या प्रकरणाचे पत्ते उघडायला सुरुवात होणार आहे.

तत्कालीन भूसंपादन अधिकारी तथा परभरणीच्या उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यापासूनच त्या फरार होत्या. पोलिसांनी परभणी आणि हिंगोली येथील निवासस्थानी भेट दिल्यानंतरही त्या आढळून आल्या नाहीत. तेव्हापासून पोलिस पथक त्यांच्या सातत्याने मागावर होते. यादरम्यान त्यांचाकरिता एजंट म्हणून काम करणारा नितेश येसनकर रा. पुलगाव याला पोलिसांनी अटक करुन त्यांच्या तीन खात्यातील २४ लाखांची रक्कम गोठविण्यात आली होती.

पोलिसांकडून धरपकड सुरु झाल्यावर स्वाती सुर्यवंशी यांनी वर्ध्याच्या जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनाकरिता अर्ज दाखल केला होता. न्यायालयाकडून तीन तारखा देण्यात आल्यानंतर आज गुरुवारी अंतिम सुनावणी होती. पण, न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामीन नाकारला. या जामिनावर सुनावणी होण्यापूर्वीच पोलिसांच्या पथकाने त्यांना हिंगोलीतून ताब्यात घेतले. आता त्यांना वर्ध्यात आणल्यानंतर त्यांच्याकडून काय माहिती पुढे येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाच आरोपींना अटक, शनिवारीपर्यंत पोलिस कोठडी
या अपहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या चमुने प्रारंभी सूर्यवंशी यांचा एजंट म्हणून काम करणाऱ्या पुलगाव येथील नितेश येसनकर याला अटक केली. त्याला न्यायालात हजर करुन त्याची ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी मिळविली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ज्यांच्या नावावर रक्कम पाठविण्यात आली व नंतर ती येसनकर याला दिली, अशा चौघांनाही पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली आहे.

यामध्ये निशांत किटे रा. पुलगाव, प्रफुल्ल देवढे रा. आंजी अंदोरी, नितीन बाबुराव कुथे रा. पुलगाव व आकाश सुरेश शहाकार रा. खर्डा शिरपूर यांचा समावेश आहे. येसनकरसह या सर्वांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता सर्वांनाच शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती तपास अधिकारी कांचन पांडे यांनी दिली.

Web Title: fugitive land acquisition officer arrested by the police, fraud of 2 crore 64 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.