शेतकऱ्यांनी तणनाशक फवारले, दीडशे एकरांतील सोयाबीन जळाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 15:58 IST2024-08-13T15:58:16+5:302024-08-13T15:58:53+5:30
कृषी विभाग बांधावर : आष्टीतील खडकी, किन्हाळा येथील प्रकार

Farmers sprayed herbicides, burning 150 acres of soybeans
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : तालुक्यातील खडकी व किन्हाळा या दोन गावांतील २६ शेतकऱ्यांनी सोयाबीनमध्ये वाढलेल्या तणावर तणनाशकाची फवारणी केली. पण, आठवडाभरातच सोयाबीनचे पीक जळाले. यामुळे शेतकरी धास्तावले असून, त्यांनी कृषिमंत्र्याकडे तक्रार केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत कृषी विभागाचे पथक दोन्ही गावांमध्ये दाखल झाले. पिकांची पाहणी करून तणनाशकाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेला पाठविले. आता याच्या अहवालाची शेतकऱ्यांसह अधिकाऱ्यांनाही प्रतीक्षा आहे.
गेल्या महिनाभरापासून आष्टी तालुक्यात पावसाने चांगलाच कहर केला आहे. सततच्या पावसामुळे खरिपातील पिकामध्ये मोठ्या प्रमाणात तण वाढले. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी तणनाशकाचा वापर करून फवारणी सुरू केली. त्यामुळे खडकी व किन्हाळा येथील २६ शेतकऱ्यांनी 'क्युरॉन' नावाचे तणनाशक खडकी येथील कृषी सेवा केंद्रातून खरेदी करून त्याची फवारणी केली. फवारणीनंतर आठवडाभरानंतर शेतातील तण कायम राहून सोयाबीन जळाल्याचे निदर्शनास आले. या २६ शेतकऱ्यांची दीडशे एकरांतील सोयाबीन जळाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांनी कृषिमंत्री, वर्धा लोकसभा प्रमुख सुमित वानखडे, उपविभागीय कृषी अधिकारी आर्वी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वर्धा, तालुका कृषी अधिकारी आष्टी, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद वर्धा, मोहीम अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या. याची दखल घेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी देशमुख यांनी जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक, तालुका कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी आणि मोहीम अधिकारी जिल्हा परिषद वर्धा या चौघांना तत्काळ जळालेल्या सोयाबीनची पाहणी करून नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्याच्या सूचना दिल्यात. आता प्रयोगशाळेमधील अहवाल प्राप्त झाल्यानंतर सोयाबीन कशाने जळाली याचे निदान लावता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान
शेतकरी रोशन नागपुरे, संकेत नागपुरे, यशोदानंदन काबरा, मिलिंद उदापुरे, हिमांशू उदापुरे, मिलिंद मोरे, कुसुम पांडे, योगेश नागपुरे, मंदा शरद नागपुरे, सूरज कडू, शरद मोरे, सुरेंद्र नागपुरे, संगीता नागपुरे, अरविंद नागपुरे, पवन नागपुरे, आशा लांडगे, हेमंत ठाकरे, आशिष ठाकरे, प्रवीण ठाकरे, दिलीप इंगळे, किरण डोळस, प्रभाकर नागपुरे, शरद नागपुरे, संजय भिवापुरे, पुरुर्षोत्तम नागपुरे आणि प्रल्हाद डोळस या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, भरपाई देण्याची मागणी होत आहे.
"आम्ही शेतामध्ये तण वाढल्याने फवारणी केली. मात्र, हे तणनाशक सदोष असल्याने आमची सोयाबीन जळाली. अधिकाऱ्यांनी नमुने प्रयोगशाळेत पाठविले. अहवालाची वाट पाहणे सुरू आहे. आमचे आर्थिक उदरनिर्वाहाचे साधनच संपल्याने आता उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न पडला आहे. शासनाने तत्काळ आम्हाला न्याय द्यावा, अशी आमची मागणी आहे."
- शुभम नागपुरे, शेतकरी खडकी.
"खडकी व किन्हाळा येथील मौजामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन जळाली तेथील नमुने घेऊन प्रयोगशाळेला पाठविले आहे. कीटकनाशक आणि तणनाशक या दोन्हीचे नमुने घेतले असून, त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तपासाची पुढील दिशा ठरविता येईल."
- दिगंबर साळे, तालुका कृषी अधिकारी, आष्टी (शहीद)