तंबाखूच्या वादातून झालेल्या हाणामारीत ‘अविनाश’चा मृत्यू; आरोपी दाम्पत्याला बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2022 18:34 IST2022-07-02T18:32:19+5:302022-07-02T18:34:21+5:30
अविनाश हा आरोपींच्या घरासमोरुन जात असताना त्याने आरोपी उमेश याच्याकडे तंबाखू मागितला. उमेशने तंबाखू देत नाही, असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. अविनाश याने शिवीगाळ का करतोस, असे म्हटले असता दोघांमध्ये वाद झाला.

तंबाखूच्या वादातून झालेल्या हाणामारीत ‘अविनाश’चा मृत्यू; आरोपी दाम्पत्याला बेड्या
वर्धा : तंबाखू न दिल्याने झालेल्या वादात शिवीगाळ करण्यास हटकणाऱ्या अविनाश दिलीप नेहारे या अल्पवयीन मुलाला त्याच्या आई-वडिलांनी जबर मारहाण केली होती. ही घटना २९ जून रोजी धामणगाव वाठोडा येथे घडली होती. अविनाश याला जबर मारहाण केल्याने तो सावंगी येथील रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सावंगी पोलिसांनी दाम्पत्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून, अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्याची माहिती सावंगी पोलिसांनी दिली.
उमेश मनीराम उईके (४४), उषा उमेश उईके (३५) (दोघेही रा. धामणगाव वाठोडा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, १३ वर्षीय अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बेबी नेहारे यांचा मुलगा अविनाश हा आरोपींच्या घरासमोरुन जात असताना त्याने आरोपी उमेश याच्याकडे तंबाखू मागितला. उमेशने तंबाखू देत नाही, असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. अविनाश याने शिवीगाळ का करतोस, असे म्हटले असता दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान, उमेशची पत्नी उषा घरातून बाहेर आली आणि दोन्ही आरोपींनी अविनाशला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपीच्या १३ वर्षीय मुलाने कुऱ्हाडीच्या दांड्याने अविनाशच्या डोक्यावर जबर मारहाण केली. उमेशने चाकूने अविनाशच्या छातीवर वार करत जखमी केले होते.
अविनाशच्या मृत्यूपूर्व जबाबावरून सावंगी पोलिसांनी जबर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास केला. या तपासादरम्यान आरोपी उमेश याला ३० जून रोजी तर आरोपी उषा हिला १ जुलै रोजी पोलिसांनी अटक केली होती, तर जखमी अविनाशवर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, शनिवार, २ जुलै रोजी अविनाशचा मृत्यू झाला. त्यामुळे सावंगी पोलिसांनी कलम वाढ करून हत्येचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांनी दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस पुढील तपास करत आहेत.