सेलूतील सीसीआयची कापूस खरेदी दहा दिवसांपासून बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 16:52 IST2024-12-18T16:49:23+5:302024-12-18T16:52:41+5:30

ग्रेडरची केली बदली : शेतकऱ्यांची होताहेत अडचण

CCI's cotton procurement in Selu has been closed for ten days | सेलूतील सीसीआयची कापूस खरेदी दहा दिवसांपासून बंद

CCI's cotton procurement in Selu has been closed for ten days

लोकमत न्यूज नेटवर्क 
सेलू :
शेतकऱ्यांना खासगी जिनिंगमध्ये कापूस विकणे नुकसानीचे ठरत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू उपबाजार पेठ अंतर्गत येणाऱ्या येथील काही जिनिंगमध्ये शासनाने सीसीआयची कापूस खरेदी सुरू केली होती. यामुळे शेतकऱ्यांनाही आनंद झाला होता, मात्र हा आनंद औटघटकेचा ठरला. येथील संकलन केंद्रावर कापूस कमी येत असल्याचे कारण पुढे करून ग्रेडर हर्षल शिंदे यांची यवतमाळ येथे बदली करण्यात आली. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून सीसीआयची खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष वाढला आहे.


यावर्षी निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे आधीच नापिकी झाली आहे. भरीसभर योग्य भावही मिळत नाही. शेतकऱ्यांच्या सततच्या रेट्यामुळे शासनाने सीसीआयची कापूस खरेदी सुरू केली. मात्र त्याच्यातही खोडा घातला जात आहे. तीन आठवड्यांपूर्वी सुरू झालेल्या येथील कापूस संकलन केंद्रावर कापूस विक्रीसाठी बारा भानगडी केल्या जात आहे. कापूस विक्रीची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतः कागदपत्रासह हजर राहण्याचा नियमही शेतकऱ्यांना त्रास देऊन गेला. 


खासगी कापूस संकलन केंद्रापेक्षा कापूस खरेदी केंद्रावर चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल इकडे होता मात्र, येथील अधिकाऱ्यांच्या भानगडी शेतकऱ्यांना त्रासदायक ठरल्या सेलूच्या कापूस संकलन केंद्रावर कापसाची आवक कमी आहे, असे सांगत भारतीय कपास निगमच्या अकोला येथील महाप्रबंधकाने येथील ग्रेडरची बदली करून या ठिकाणचा प्रभार वायगाव व देवळी येथील केंद्र संचालक हिवसे यांच्याकडे दिला. ते सेलू येथे येतच नसल्याने सेलूतील सीसीआयच्या केंद्रावरील कापूस खरेदी गेल्या दहा दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी जिनिंगमध्ये कापूस विकण्याची वेळ आली आहे. शासनाची कापूस खरेदी सुरू व्हावी यासाठी वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. 


नाफेडच्या सोयाबीन खरेदीची गती मंदावली....
नाफेडच्यावतीने खरेदी विक्रीच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या सात- बारासह सोयाबीनची नोंदणी केली होती त्यांची सोयाबीन खरेदी सुरू असून त्याची गती संथ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल विकावा तरी कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी बाजार समितीत मिळेल त्या भावात सोयाबीन विकून मोकळे होत आहे.


"कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारपेठ सेलू येथे सीसीआयची कापूस खरेदी सुरू होती. सेलू तालुक्यात काळी जमीन व कपाशीला सिंचनाची व्यवस्था असल्याने कापूस सुरुवातीला कमी निघतो. त्यामुळे विक्रीसही कापूस कमी येतो. सीसीआयने कापूस विक्रीसाठी कमी येतो हे कारण पुढे करीत ग्रेडची बदली केली. त्यामुळे बाजार समितीचे सभापती केसरीचंद खंगार यांनी सीसीआयच्या महाप्रबंधकांशी फोनवर चर्चा करून ग्रेडर देण्याची मागणी केली. तसेच बाजार समितीने ११ डिसेंबरला महाप्रबंधकांना पत्रही दिले. कायमस्वरूपी ग्रेडर द्यावा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे." 
- महेंद्र भांडारकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती सिंदी / सेलू

Web Title: CCI's cotton procurement in Selu has been closed for ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.