ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपची गांधीगिरी; राष्ट्रपित्यांच्या पुतळ्यासमोर दिले धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2022 18:19 IST2022-05-23T17:37:30+5:302022-05-23T18:19:34+5:30
फडणवीस सरकारने काढलेला ओबीसी आरक्षणाचा ऑर्डिनन्स या सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने लॅप्स केल्याचा आरोप या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला.

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपची गांधीगिरी; राष्ट्रपित्यांच्या पुतळ्यासमोर दिले धरणे
वर्धा : ओबीसींचे आरक्षण कायम रहावे यासाठी राज्यातील ठाकरे सरकार दोषी असल्याचा आरोप करीत राज्य शासनाचे ओबीसीच्या आरक्षणाकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी भारतीय जनता ओबीसी मोर्चाच्या वतीने वर्धा शहरातील सिव्हिल लाईन भागातील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध नाेंदविला.
ज्या पिटाशनमुळे ओबीसींना आपल्या हक्काचे राजकीय आरक्षण गमविण्याची वेळ आली, ती पीटिशन दाखल करणारा वाशिमच्या काँग्रेस पक्षाच्या आमदारांचा मुलगा आणि भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे देखील काँग्रेस पक्षाचेच आहेत. फडणवीस सरकारने काढलेला ओबीसी आरक्षणाचा ऑर्डिनन्स या सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने लॅप्स केल्याचा आरोप या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला.
ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यात यावेच, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. आंदोलनात आ. दादाराव केचे, मिलिंद देशपांडे, प्रवीण चोरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वैशाली येरावार, शीतल डोंगरे, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, वरुण पाठक, नीलेश देशमुख आदी सहभागी झाले होते.