दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली; दोघे ठार, एक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2022 10:36 IST2022-09-12T10:33:22+5:302022-09-12T10:36:14+5:30
यवतमाळ रस्त्यावरील अपघात : गंभीर जखमीवर उपचार सुरू

दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली; दोघे ठार, एक गंभीर जखमी
वर्धा : भरधाव दुचाकी चालविल्यामुळे दुचाकी अनियंत्रित होऊन पुलाच्या कठड्यावर जाऊन धडकल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात देवळी ते यवतमाळ रस्त्यावर असलेल्या यशोदा नदीच्या पुलावर शनिवारी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास झाला.
दुर्गेश सुरेश डेहणकर, समीर शेंडे, दोन्ही रा. कोटंबा, ता. बाभूळगाव, जि. यवतमाळ, अशी मृतकांची नावे आहेत, तर स्वप्नील ढाकरे हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देवळी पोलिसांनी दिली.
दुर्गेश सुरेश डेहणकर हा ट्रिपलसीट एमएच-२९/बीएस-५६१३ क्रमांकाच्या दुचाकीने यवतमाळकडे जात होता. मात्र, त्याने हयगयीने व निष्काळजीपणे दुचाकी भरधाव चालविल्याने अनियंत्रित दुचाकी थेट यशोदा नदीच्या पुलाच्या कठड्यावर जाऊन धडकली. या धडकेत दुचाकीचालक दुर्गेश आणि समीर या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर स्वप्नील हा गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच देवळी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले. पुढील तपास देवळी पोलीस करीत आहेत.