वर्धेचा रणसंग्राम: १९९९ अन् २००४ मध्ये झाली चुरशीची निवडणूक

By रवींद्र चांदेकर | Published: April 5, 2024 03:17 PM2024-04-05T15:17:57+5:302024-04-05T15:20:18+5:30

कमी मताधिक्क्यांचे विजय : केवळ तीन अन् सात हजारांनी उमेदवार विजयी

battle of wardha in 1999 and 2004 there were tight lok elections | वर्धेचा रणसंग्राम: १९९९ अन् २००४ मध्ये झाली चुरशीची निवडणूक

वर्धेचा रणसंग्राम: १९९९ अन् २००४ मध्ये झाली चुरशीची निवडणूक

रवींद्र चांदेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, वर्धा : आत्तापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत १९९९ आणि २००४ मधील निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली होती. या दोन्ही निवडणुकींत विजयी उमेदवारांचे मताधिक्य केवळ तीन आणि सात हजारांचे होते. लागोपाठ दोन निवडणूक निकालांच्या वेळी मतदारांची उत्कंठा शिगेला पोहाेचली होती.

आत्तापर्यंत १७ वेळा लाेकसभा निवडणूक झाली. वर्धेत १९९१ मध्ये पहिल्यांदा कम्युनिस्टांनी काँग्रेसला हादरा दिला होता. नंतर १९९६ पासून भाजपने काँग्रेसला धक्के देणे सुरू केले. त्यामुळे २००४ ची निवडणूक सर्वाधिक चुरशीची ठरली होती. भाजपचे सुरेश वाघमारे यांनी केवळ तीन हजार १८८ मतांनी काँग्रेसच्या प्रभा राव यांचा पराभव केला होता. त्यावेळी वाघमारे यांना दोन लाख ६९ हजार ४५, तर प्रभा राव यांना दोन लाख ६५ हजार ८५७ मते मिळाली होती. त्यावेळी रिंगणात असलेल्या बसपाचे सोमराज तेलखेडे यांना ५४ हजार नऊ, सीपीएमचे यशवंत झाडे यांना १४ हजार ८२३, शिवराज्य पार्टीचे जगन्नाथ राऊत यांना नऊ हजार ८४५, एआरपीचे श्रीकृष्ण उबाळे यांना सहा हजार ९९१, तर गोंगपाचे नारायण चिडाम यांना पाच हजार ५३५ मते मिळाली होती. विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या मतांमधील फरकापेक्षाही या सर्वांना दोन हजारांपेक्षा जास्त मते होती, हे विशेष.

तत्पूर्वी १९९९ मध्येही चुरशीची लढत झाली होती. त्यावेळीही काँग्रेसच्या वतीने प्रभा राव आणि भाजपच्या सुरेश वाघमारे रिंगणात होते. त्यात प्रभा राव यांनी वाघमारे यांचा केवळ सात हजार ५९ मतांनी पराभव केला होता. प्रभा राव यांना दोन लाख ४९ हजार ५६४, तर सुरेश वाघमारे यांना दोन लाख ४२ हजार ५०२ मते मिळाली होती. त्यावेळी रिंगणातीत तिसरे मातब्बर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्ता मेघे यांनी तब्बल एक लाख ५२ हजार ८५६ मते घेतली होती. विजयी आणि पराभूत उमेदवारापेक्षा त्यांना तब्बल एक लाख ४५ हजार मते जास्त होती, हे विशेष. या दोन्ही निवडणुका प्रचंड गाजल्या होत्या. जय आणि पराजयातील अंतर केवळ तीन ते सात हजार होते.

फरकापेक्षा रिंगणातील उमेदवारांना जादा मते

१९९९ आणि २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत विजयी आणि पराभूत उमेदवारांमधील फरकापेक्षा रिंगणातील इतर उमेदवारांना जादा मते मिळाली होती. तीन आणि सात हजारांच्या फरकाने उमेदवार विजयी झाला होता. या फरकापेक्षा रिंगणातील उमेदवारांनी जादा मते घेतली होती. दोन्ही निवडणुकीत मतदारांची उत्कंठा ताणली हाेती. निकालाच्या वेळी शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता कायम होती.

Web Title: battle of wardha in 1999 and 2004 there were tight lok elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.