आर्वी शहरात बोगस खतांची तब्बल ९६० पोती केली जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 13:56 IST2024-07-26T13:47:45+5:302024-07-26T13:56:56+5:30
खते अप्रमाणित असल्याचा अहवाल : दोनशेवर शेतकरी फसले

As many as 960 bags of bogus fertilizers were seized in Arvi city
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : शहरातील वाल्मीक वॉर्डात असलेल्या गोदामाची पाहणी करून बोगस खतांची ९६० पोती असा एकूण १५ लाख रुपयांचा बोगस खताचा माल जप्त करण्यात आला. ही कार्यवाही पंचायत समिती कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. तालुक्यातील जवळपास २०० वर शेतकऱ्यांना बोगस खताचे वितरण करण्यात आल्याने त्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे, हे तितकेच खरे.
तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अनेकांनी पेरणी केली आहे. अशातच खतांची मागणीही मोठ्या प्रमाणात असते. मात्र, शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत अनेक जण बोगस खतांची विक्री करतात. पुणे वडकी येथील रामा फर्टिलायझर्स कंपनीचे खत बोगस असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. हे बोगस खते अग्रवाल कृषी केंद्राच्या गोदामातून जप्त केले आहे.
कृषी विभागाने १०:२६:२६ चा बॅच नंबर १६७/२४ चे ४६९ पोती, डीएपीचे ३६६ पोती, एमओपीच्या ७५ पोती असा एकूण ९६० बोगस खतांचा साठा जप्त केला. कृषी अधिकारी रवींद्र डुबे, विस्तार अधिकारी विशाल देवसकर यांनी कारवाई करुन गोदाम सील केले.
'रॅकेट'ची पाळेमुळे शोधण्याची गरज
जिल्ह्यात यापूर्वीदेखील बोगस खतांचा साठा आढळून आला आहे. आर्वी तालुक्यात ६७ कृषी केंद्र असून आर्वी शहरात १६ कृषी केंद्रांचा समावेश आहे. त्यामुळे बोगस खत विक्रीचे हे मोठे रॅकेट तर नसेल ना, अशी चर्चा आता पुढे येत असून या रॅकेटची पाळेमुळे शोधून काढण्याची मागणी केली जात आहे.
प्रयोगशाळेतून अहवाल आल्यावर झाले स्पष्ट
३ जुलै रोजी कार्यवाही केली. १०:२६:२६, डीएपी, एमओपी या तीन प्रकारच्या खतांचे प्रत्येकी तीन नमुने घेतले. नमुने खत नियंत्रण व तपासणी प्रयोगशाळा लेबोटरी, जॉईंट डायरेक्टर कृषी संचाल नालय नागपूरला पाठविले होते. बुधवारी अप्रमाणित असल्याचा अहवाल आर्वी पंचायत समिती कृषी विभाग यांना प्राप्त झाला.
वरिष्ठांच्या निर्देशानुसार तपासणी करून कार्यवाही केली. ज्या गोदामात बोगस खत आढळून आले ते गोदाम ज्योती जी. अग्रवाल यांच्या मालकीचे
आहे. एकूण ९६० बॅग संशयास्पद आढळल्या. त्या सील केल्या. नमुने प्रयोगशाळेत पाठवले असता त्याचा अहवाल २४ रोजी प्राप्त झाला. त्यामुळे कंपनी व दुकानदार या दोघांनाही २५ रोजी कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली.
- रवींद्र दुबे, कृषी अधिकारी, पं. स. आर्वी.