‘लोकमत’ची दखल; गर्भवती श्वानाला ठार मारणाऱ्यास केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2022 14:43 IST2022-08-26T14:40:44+5:302022-08-26T14:43:15+5:30
देवळी येथील घटनेचे पडसाद : प्राणिमित्रांसह विविध संघटना आक्रमक, आरोपीस ठोकल्या बेड्या

‘लोकमत’ची दखल; गर्भवती श्वानाला ठार मारणाऱ्यास केली अटक
वर्धा : देवळी शहरातील ठाकरे चौकात एका माथेफिरूने चक्क गर्भवती श्वानाच्या पोटात चाकू भोसकून हत्या केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. या व्हिडिओची शहानिशा करुन ‘लोकमत’ने २५ रोजी वृत्त प्रकाशित केले. अखेर देवळी पोलिसांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत आरोपी अक्षय बहिरम मडावी (२४) रा. कामडीपुरा देवळी, याला नागपूर येथून अटक केली.
२१ रोजी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास देवळी शहरातील ठाकरे चौकात एका माथेफिरूने चांगलाच हैदोस घातला. हातात खुलेआम चाकू घेऊन तो परिसरात वावरत होता. त्या माथेफिरूने चक्क एका गर्भवती श्वानाच्या पोटावर चाकूने सपासप वार करुन निर्दयतेने हत्या केली. हा घटनाक्रम परिसरात लागून असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाला. आरोपीला कठोर कारवाई व्हावी, यासाठी ‘लोकमत’ने २५ रोजी वृत्त प्रकाशित करताच पोलिसांनी दखल घेत अज्ञात माथेफिरुविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी अक्षय याने हे कृत्य मद्यधुंदीत केल्याची कबुली दिली. तो घटनेनंतर नागपूर येथे उर्सकरिता गेला होता. तेथून त्याला पोलिसांनी अटक केली.
मुक्या जीवाला न्याय द्या, अन्यथा उपोषण
देवळी येथील मोकाट श्वानाला अमानुषरीत्या ठार मारणाऱ्या माथेफिरूला अटक करण्याची मागणी विसावा अॅनिमल्स फाउंडेशनने पोलीस अधीक्षक प्रशांत हाेळकर यांना निवेदनातून केली. मुक्या जीवाला न्याय न मिळाल्यास बेमुदत उपोषणला बसू, असा इशाराही विसावा अॅनिमल्स फाउंडेशनचे सचिव किरण दामोदर मोकदम यांनी निवेदनातून दिला.
युवा परिवर्तनने दिला आंदोलनाचा इशारा
‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची समाजमाध्यमांवर दखल घेण्यात आली. त्याअनुषंगाने वर्ध्यातील युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांनी आरोपीविरुद्ध कठाेर कारवाई करुन अटक करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
अशीही क्रूरता; पोटात चाकू भोसकून गर्भवती श्वानाची माथेफिरूने केली हत्या
आरोपीच्या अटकेसाठी रात्रभर घातली गस्त
गर्भवती श्वानाला ठार मारणाऱ्या आरोपीबाबत पुरावे पोलिसांना प्राप्त झाले त्यानंतर आरोपीच्या शोधार्थ पथक रवाना करण्यात आले होते. अथक परिश्रमानंतर २४ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास माथेफिरु आरोपीस देवळी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांनी दिली.