चालकाला डुलकी, भरधाव ट्रक उलटला; आष्टीच्या टी-पॉइंटवरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 11:26 IST2022-12-24T11:24:35+5:302022-12-24T11:26:58+5:30
संत्रा कॅरेट रस्त्यावर अस्ताव्यस्त

चालकाला डुलकी, भरधाव ट्रक उलटला; आष्टीच्या टी-पॉइंटवरील घटना
तळेगाव (श्याम. पंत.) : संत्रा भरून इंदूरकडे निघालेल्या भरधाव ट्रकच्या चालकाला अचानक डुलकी आली. त्यामुळे ट्रक दुभाजकावर उलटल्याने संत्र्याचे कॅरेट रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले होते. हा अपघात आष्टी टी-पॉइंटववर गुरुवारी रात्री एक वाजताच्या दरम्यान घडला.
वरूड येथून संत्रा भरून एपी ३९-यूएच ६१४८ क्रमांकाचा ट्रक इंदूरकडे जात होता. भरधाव असलेल्या या ट्रकच्या चालकाला गुुरुवारी रात्री एक वाजेदरम्यान तळेगाव येथील आष्टी टी-पॉइंटवरील वळण रस्त्यावर डुलकी आली. यामुळे हा दुभाजकावर ट्रक उलटून ट्रकमधील संत्र्यांचे कॅरेट रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले. कॅरेट पडल्याने वरूड ते तळेगाव महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती.
या अपघातात ट्रक चालक महेश नरसैया (रा. येल्लूर, आंध्र प्रदेश) व क्लिनर कल्याण कृष्णा यादला हे दोघेही किरकोळ जखमी झाले. या अपघाताची माहिती तळेगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून रस्त्यावर आडवा झालेला ट्रक सकाळी क्रेनच्या मदतीने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.