आचारसंहितेचा भंग केल्यामुळे कराळे गुरुजींविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 17:07 IST2024-11-29T17:04:55+5:302024-11-29T17:07:22+5:30

Wardha : मतदारसंघ सोडून बाहेर पडणे भोवले

A case has been filed against Karale Guruji for violating the code of conduct | आचारसंहितेचा भंग केल्यामुळे कराळे गुरुजींविरुद्ध गुन्हा दाखल

A case has been filed against Karale Guruji for violating the code of conduct

लोकमत न्यूज नेटवर्क 
वर्धा :
विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेंतर्गत मतदानाच्या दिवशी स्टार प्रचारकांना आपला मतदारसंघ सोडून बाहेर जात येत नाही. असे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे हे मतदारसंघ सोडून उमरी (मेघे) येथील बूथवर गेले होते. त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि भरारी पथकाच्या तक्रारीवरून त्यांच्याविरुद्ध आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी सावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्टार प्रचारकांना मतदानाच्या ४८ तासांपूर्वी इतर मतदारसंघ सोडून आपल्या मतदारसंघात परतावे लागते. या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडूनही सूचना करण्यात आल्या होत्या; पण, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे यांनी याकडे दुर्लक्ष केले. ते स्टार प्रचारक असून त्यांचे मूळ गाव हे मांडवा असून, ते देवळी विधानसभा मतदारसंघात येतात. असे असतानाही मतदानाच्या दिवशी त्यांनी वर्धा विधानसभा मतदारसंघातील उमरी (मेघे) येथील बूथवर गेले होते.


यावेळी येथे त्यांनी वाद घाल्याने चांगलीच हाणामारी झाली. याचे व्हिडीओही सर्वत्र व्हायरल होऊन प्रकरण थेट सावंगी पोलिस ठाण्यात पोहोचले. इतकेच नाही तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचे उमेदवार अशी शाब्दिक चकमकही उडाली होती. त्यामुळे नितेश कराळे यांनी मतदारसंघ सोडून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार भाजपने निवडणूक विभागाकडे केली.


यासोबतच उमरीत हाणामारीनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या भरारी पथकानेही तशी तक्रार केल्यामुळे लोकप्रतिनिधी अधिनियम कायद्याच्या कलम १२६ अंतर्गत आणि भारतीय न्याय संहिता २२३ अंतर्गत सावंगी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे सध्या उमरी येथील प्रकरण नितेश कराळे यांच्या चांगलेच अंगलट आले असून हे प्रकरण कुठे थांबते याकडे लक्ष लागले आहे.

 

Web Title: A case has been filed against Karale Guruji for violating the code of conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.