वर्षभरात वीज चोरीचे १ हजार २२५ धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची वीज चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 18:34 IST2025-04-14T18:33:44+5:302025-04-14T18:34:46+5:30

Wardha : मीटर घेऊनच विजेचा वापर करावा

1,225 shocking cases of electricity theft exposed in a year; Electricity theft worth crores of rupees | वर्षभरात वीज चोरीचे १ हजार २२५ धक्कादायक प्रकार उघडकीस; कोट्यवधी रुपयांची वीज चोरी

1,225 shocking cases of electricity theft exposed in a year; Electricity theft worth crores of rupees

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :
जिल्ह्यात महावितरणने केलेल्या धडक कारवाईत गेल्या १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या आर्थिक वर्षात वीज चोरीचे तब्बल १ हजार २२५ गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. या चोरीमुळे महावितरणला १ कोटी ९३ लाख ११ हजार रुपयांच्या १ लाख ३३ हजार ४८९ युनिट विजेचे नुकसान झाले आहे. याव्यतिरिक्त, प्रत्यक्ष गरजेव्यतिरिक्त इतर कारणांसाठी किंवा अप्रत्यक्षपणे वीज वापरणाऱ्या ६० ग्राहकांवरही कठोर कारवाई करण्यात आली आहे. 


महावितरणने वीज चोरीविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेतलेल्या या कारवाईमध्ये वर्धा जिल्ह्यातील १ हजार २२५ वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांना चोरीच्या बिलासह दंड ठोठावण्यात आला आहे. यापैकी १ हजार २१३ ग्राहकांकडून तडजोडीपोटी ३८ लाख १४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आकडेवारीनुसार, वीज चोरी करणाऱ्यांमध्ये तारांवर आकडा टाकून वीज चोरणाऱ्या ३६५ ग्राहकांचा समावेश आहे, तर ८६० ग्राहकांनी थेट मीटरमध्ये छेडछाड करणे, मीटर बंद पाडणे, रिमोट कंट्रोलने मीटर दुरून बंद करणे, मीटरमध्ये छिद्र पाडून रोध निर्माण करणे किंवा मीटरची गती कमी करणे यासारख्या गैरमार्गाचा अवलंब करून वीज चोरली आहे. यासोबतच, अधिक धक्कादायक बाब म्हणजे, प्रत्यक्ष वापराव्यतिरिक्त इतर कारणांसाठी किंवा अप्रत्यक्ष वीज वापरणाऱ्या ६० ग्राहकांनी ३ हजार ५८७ युनिट विजेचा अनधिकृत वापर केला, ज्यासाठी त्यांना ७ लाख ८० हजार रुपयांचे देयक आकारण्यात आले आहे.


वीज चोरीसाठी वापरल्या नवनवीन क्लृप्त्या
मोहिमेदरम्यान एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या आर्थिक वर्षाच्या काळात उघडकीस आलेल्या वीज चोरीच्या प्रकरणांमध्ये चोरांनी अवलंबलेल्या क्लृप्त्या पाहून अधिकारीही चक्रावून गेले. यात मीटरमध्ये अत्यंत चलाखीने फेरबदल करणे, ते पूर्णपणे बंद पाडणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत रिमोटने मीटर बंद करणे, तसेच मीटरच्या मागील बाजूस छिद्र पाडून त्यात अडथळा निर्माण करून मीटरची गती कमी करणे यासारख्या नवनवीन पद्धतींचा वापर उघडकीस आला आहे.


मीटर घेऊनच विजेचा वापर करावा
वीज चोरीच्या अनधिकृत विद्युतभारामुळे वीजवाहिन्या आणि रोहित्रांवर क्षमतेपेक्षा जास्त ताण येतो. यामुळे रोहित्र निकामी होणे, शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होणे यासारख्या समस्या उद्भवतात. याचा नाहक त्रास नियमितपणे वीज बिल भरणाऱ्या प्रामाणिक ग्राहकांना सहन करावा लागतो आणि महावितरणलाही मोठा आर्थिक फटका बसतो. वीजपुरवठा खंडित झाल्यास ग्राहकांच्या रोषालाही सामोरे जावे लागते. त्यामुळे, सर्व नागरिकांनी अधिकृत वीज मीटर घेऊनच विजेचा वापर करावा आणि वापरलेल्या विजेच्या बिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.


प्रत्यक्ष तपासणीला सुरुवात
वीज चोरांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. याअंतर्गत, सदोष मीटर, तसेच सरासरी वीज बिल असलेल्या सर्वच ग्राहकांच्या मीटरची कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे. यासोबतच, थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेले आणि सवलत देऊनही अभय योजनेत सहभागी न झालेल्या ग्राहकांविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा सर्व ग्राहकांच्या प्रत्यक्ष तपासणीला सुरुवात झाली आहे.

Web Title: 1,225 shocking cases of electricity theft exposed in a year; Electricity theft worth crores of rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.