Osmanabaad elections result two villagers signed the contract on stamp paper | बाईकची पैज...ओमराजे हरणार की जिंकणार?; 'त्या' दोघांनी स्टॅम्प पेपरवर केला करार

बाईकची पैज...ओमराजे हरणार की जिंकणार?; 'त्या' दोघांनी स्टॅम्प पेपरवर केला करार

उस्मानाबाद - सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष मतदारांपर्यत पोहचण्यासाठी जास्तीत जास्त प्रचार करत आहेत. कार्यकर्तेही जीवाचं रान करुन आपल्या नेत्याला निवडून आणण्यासाठी झटताना दिसत आहे. निवडणुकीच्या रिंगणात बाजी कोण मारणार याचीच चर्चा गावागावात चौकाचौकात सुरु असताना पाहायला मिळते. 

ग्रामीण भागात निवडणुकीचा माहोल काही औरच असतो. कार्यकर्ते आपलाचा नेता विजयी होईल अशा थाटात बोलत असतात. अनेक जण निवडणुकीच्या निकालांवर तर्कवितर्क लावत असतात. यात उस्मानाबादच्या राघुचीवाडी या गावातील दोन पठ्ठ्यांनी निवडणूक निकालांवर पैज लावत चक्क स्टॅम्प पेपरवर करारनामा लिहून घेतलाय. उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत यंदा शिवसेना-भाजपाकडून ओमराजे निंबाळकर निवडणूक लढवत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीकडून राणा रणजितसिंह पाटील निवडणुकीला उभे आहेत. त्यामुळे उस्मानाबादची निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. 

उस्मानाबादच्या मतदारसंघात कोण जिंकणार यासाठी राघुचीवाडीमधील ग्रामस्थ बाजीराव करवर आणि शंकर मोरे या दोन पठ्ठ्यांनी तर 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा लिहून घेतला आहे. यामध्ये लिहून देणारे शंकर मोरे म्हणतात की जर उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात ओमराजे निंबाळकर निवडून आले तर माझ्या मालकीच्या बजाज कंपनीच्या दोन गाड्या बाजीराव करवर यांना विना मोबदला बक्षिस म्हणून दिले जाईल. सदरील गाडीची मालकी लिहून घेणारे बाजीराव करवर यांची राहील त्यास माझा कोणताही आक्षेप नसल्याचं शंकर मोरे यांनी करारनाम्यात लिहून दिलं आहे. निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 मे रोजी शंकर मोरे आपल्या मालकीची गाडी बाजीराव करवर यांच्या नावे करणार आहेत. मात्र जर निवडणुकीत ओमराजे निंबाळकर पराभूत झाले तर बाजीराव करवर यांची दोन चाकी गाडी शंकर मोरे यांच्या नावाने करतील असं या करारनाम्यात नमूद करण्यात आलं आहे. 

इतकंच नाही तर या करारनाम्यामध्ये हेदेखील नमूद केलंय की, या गाड्यांवरील पोलीस गुन्हे, आरटीओ, कोणतेही कर्ज काहीही असल्यास त्यांची जबाबदारी संबंधितांची राहील. हा करारनामा दोघांनीही राजीखुशीने केला असून कोणत्याही दबावाला बळी न पडता केल्याचं लिहिण्यात आलं आहे. तसेच साक्षीदार म्हणून दोन ग्रामस्थांनी सह्या देखील करण्यात आल्या आहेत.  

Web Title: Osmanabaad elections result two villagers signed the contract on stamp paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.