अंबरनाथमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-शिंदेसेना एकत्र येणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:05 IST2026-01-02T12:04:29+5:302026-01-02T12:05:22+5:30
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेचे २७ तर भाजपचे १४ नगरसेवक निवडून आले आहेत. त्या पाठोपाठ काँग्रेसचे १२ आणि राष्ट्रवादी (अजित पवार)चे चार नगरसेवक विजयी झाले तर दोन अपक्षांचाही त्यात समावेश आहे.

अंबरनाथमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-शिंदेसेना एकत्र येणार?
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये शिंदेसेना यांच्या नगरसेवकांची संख्या जास्त असली तरी त्यांना बाजूला सारून भाजप आणि काँग्रेस एकत्रित येणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे तर दुसरीकडे शिंदेसेनेच्या आमदारांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्षांसोबत चर्चा करून युतीचा प्रस्ताव पुढे केला आहे.
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेचे २७ तर भाजपचे १४ नगरसेवक निवडून आले आहेत. त्या पाठोपाठ काँग्रेसचे १२ आणि राष्ट्रवादी (अजित पवार)चे चार नगरसेवक विजयी झाले तर दोन अपक्षांचाही त्यात समावेश आहे.
चर्चेबाबत पदाधिकाऱ्यांचे मौन
भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (अजित पवार)शी चर्चा करत आहेत. या चर्चेबाबत तिन्ही पक्षांचे पदाधिकारी काहीही बोलण्यास तयार नाहीत. दुसरीकडे, शिंदेसेनेचे आ. डॉ. बालाजी किणीकर आणि माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी गुरुवारी उल्हासनगरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेत सत्ता स्थापनेबाबत चर्चा केली.
दोन दिवसांत अंतिम निर्णय
भाजपचा नगराध्यक्ष असल्यामुळे नेमकी कोणाला घेऊन सत्तेची गणिते आखणार हे अजूनही गुलदस्त्यात असून येत्या दोन दिवसांत त्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. सत्ता समीकरण पाहता शिंदेसेना आणि भाजप एकत्रित आल्यास त्यांचे संख्याबळ ४१ च्या घरात जाऊ शकते. त्यांना राष्ट्रवादी (अजित पवार) आणि अपक्षांनी साथ दिल्यास ही संख्या ४७ वर जाऊ शकतो. भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (अजित पवार) एकत्रित आल्यास सत्तेसाठी लागणारा ३० ची मॅजिक फिगर या तिघांना गाठणे सहज शक्य आहे. त्यांच्या वाट्याला एक अपक्ष नगरसेवक आल्यास हाच आकडा ३१ च्या घरात जाईल.