उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 19:56 IST2025-12-30T19:55:35+5:302025-12-30T19:56:16+5:30
हिंदुत्व आणि विकास आमचा मुद्दा आहे. देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व महाराष्ट्रात मजबूत आहे असं कृपाशंकर सिंह यांनी म्हटलं.

उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
मीरा भाईंदर - आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने उत्तर भारतीय समाजातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाने रणनीती आखली आहे. त्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारच्या आमदार मैथिली ठाकूर यांना मुंबई आणि आसपासच्या महापालिकेत प्रचारात उतरवण्यात येणार आहे. त्याशिवाय भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाकडून महापालिका क्षेत्रात उत्तर भारतीय संमेलन आयोजित करण्यात येत आहे. त्यात मीरा भाईंदर येथे भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांनी उत्तर भारतीयांचा महापौर बसवूया असं आवाहन जनतेला करण्यात आले.
या मेळाव्यानंतर कृपाशंकर सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, बिहार निवडणुकीनंतर ही ९ वी सार्वजनिक निवडणूक आहे. लवकर महापालिका निवडणुका व्हाव्यात अशी जनतेची इच्छा होती. मीरा भाईंदर महापालिकेसह २९ महापालिकेत भाजपाच्या नेतृत्वात महायुतीची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याशिवाय आम्ही इतके नगरसेवक निवडून आणू ज्यातून उत्तर भारतीय महापौर बसेल असा दावा त्यांनी केला.
तसेच नकली शिवसेना गेली, असली आमच्यासोबत आहे. हिंदुत्व आणि विकास आमचा मुद्दा आहे. देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व महाराष्ट्रात मजबूत आहे. उत्तर प्रदेशात बाबा का बुलडोजर चालतो तसा फडणवीस यांच्या विकासाचा बुलडोजर महाराष्ट्रात सुरू आहे. जे कुणी समोर असतील त्यांना उद्ध्वस्त करून भाजपाच्या नेतृत्वात २९ महापालिकेत आमची महायुतीची सत्ता येईल असंही कृपाशंकर सिंह यांनी सांगितले.
दरम्यान, मीरा भाईंदर शहराचा विकास भाजपाने कसा केलाय हे उत्तर भारतीयांना सांगण्याची गरज होती. त्यासाठी आजचे संमेलन होते. आम्ही प्रत्येक समाजाच्या बैठकीचे आयोजन केले आहे. मीरा भाईंदरमध्ये राहणाऱ्या वेगवेगळ्या समाजाचे आम्ही मेळावे घेत आहोत. आमची भूमिका त्यांच्यासमोर ठेवत आहोत. या मीरा भाईंदर शहरात बहुतांश महापौर हे उत्तर भारतीय राहिले आहेत असं आमदार नरेंद्र मेहता यांनी सांगितले.