मीरा भाईंदर मध्ये मतदान शांततेत मात्र उत्साह कमी ; अनेक मतदारांची नावे गायब   

By धीरज परब | Published: May 21, 2024 12:20 AM2024-05-21T00:20:58+5:302024-05-21T00:21:19+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात ठाणे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवार २० मे रोजी मतदान शांततेत पार पडले . तर मतदारांचा काही भागात उत्साह तर काही भागात अनुत्साह दिसून आला . मतदार यादीतून असंख्य मतदारांची नावे गायब झाल्याने त्यांना मतदाना पासून मुकावे लागले .

Voting in Mira Bhayander peaceful but low on enthusiasm; Names of many voters are missing | मीरा भाईंदर मध्ये मतदान शांततेत मात्र उत्साह कमी ; अनेक मतदारांची नावे गायब   

मीरा भाईंदर मध्ये मतदान शांततेत मात्र उत्साह कमी ; अनेक मतदारांची नावे गायब   

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात ठाणे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवार २० मे रोजी मतदान शांततेत पार पडले . तर मतदारांचा काही भागात उत्साह तर काही भागात अनुत्साह दिसून आला . मतदार यादीतून असंख्य मतदारांची नावे गायब झाल्याने त्यांना मतदाना पासून मुकावे लागले . मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्रात सुमारे ४६ टक्के  मतदान झाल्याचा अंदाज आहे. 

मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात ठाणे लोकसभा मतदार संघाच्या अनुषंगाने मीरा भाईंदर १४५ विधानसभा क्षेत्र पूर्ण येते . तर १४६ ओवळा माजिवडा चा भाग मीरा भाईंदर मध्ये येतो . मीरा भाईंदर विधानसभा मतदार संघात सकाळी ७ ते ११ वाजे पर्यंत १६ . ६४ टक्के मतदान होते. दुपारी १ वाजे पर्यंत २८ . ३९ टक्के ; दुपारी ३ वाजे पर्यंत ३७ . ५६ टक्के तर सायंकाळी ५ वाजे पर्यंत ४३ . २५ टक्के मतदान झाले होते . ग्रामीण आणि झोपडपट्टी भागात तसेच काही शहरी भागात मतदानाचा जोर दिसत होता . तर अनेक भागात अनुत्साह दिसून आला . 

ओवळा माजिवडा १४६ विधानसभा मतदारसंघात भाईंदर पूर्व तलाव मार्ग पासून इंद्रलोक , कनकिया ते थेट घोडबंदर  , काशीमीरा आदी भाग येतो व त्यात २२७ मतदान केंद्र होती . त्यात एकूण २ लाख ४० हजार २४५ मतदार असून पुरुषांची संख्या १ लाख ३१ हजार ३५२ तर महिलांची संख्या १ लाख ८ हजार ८८२ इतकी आहे . ह्या क्षेत्रात देखील मतदान संथ गतीने सुरु होते . दुपारी मतदान कमी झाले असले तरी सायंकाळच्या वेळात मतदारांनी उत्साह दाखवला . 

ह्या आधी मतदान केलेले व त्याच पत्यावर राहणाऱ्या शहरातील असंख्य मतदारांची नावेच मतदार यादीतून गायब करण्यात आल्याने मतदारांना मतदाना पासून मुकावे लागले . बोगस मतदाराच्या तुरळक घटना घडल्या . तर एका मतदाराने मतदान केंद्रात मोबाईल वर व्हिडीओ बनविल्याने त्याला क्षेत्रीय अधिकाऱ्याने पोलिसांच्या दिले . त्याच्यावर नया नगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे . 

शहरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता . किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत झाले. मीरा भाईंदर मतदार संघात निवडणूकीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना  जेवण व नाश्ता मिळाला नाही.  त्यामुळे त्यांना वेफर, चहा - बिस्कीट वर भागवावे लागले . कंत्राटी कर्मचारी व होमगार्ड यांना यांना इलेक्शन भत्ता मिळाला नाही . तर ओवळा माजीवाडा मतदार संघात मात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांना जेवण व भत्ता दिला गेला . कडक उन्हाळा असताना मतदान केंद्र व परिसरात पुरेसे पंखे नसल्याने कर्मचारी व मतदार गरमी मुळे हैराण झाल्याचे दिसत होते . 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्रात ४९ . १ टक्के मतदान झाले होते . २०२४ च्या निवडणुकीत ४ लाख ३९ हजार २८३ इतके मतदार आहेत . सायंकाळी  ५ वाजे पर्यंत ४३ . २५ टक्के इतके मतदान झाले होते . 


उत्तन - चौक भागात तणातणी 
भाईंदरच्या उत्तन परिसरात शिंदेसेनेचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा व समर्थक  आणि उद्धवसेनेसह महाआघाडीतील स्थानिक नेते - कार्यकर्ते यांच्या तणातणी घडली . ह्या भागातील मच्छीमार नेते तथा ज्येष्ठ काँग्रेस नेते लिओ कोलासो हे उत्तन येथे राजन विचारे यांच्या साठी कार्यकर्त्यांसह काम करत होते . तेव्हा मेंडोन्सा  तेथे आले . दोघांमध्ये बोलाचाली  झाल्या . तर लाईट हाऊस भागात सकाळी मेंडोन्सा व विचारे यांचे काम करणाऱ्या फ्रिडा मोरायस यांच्यात वाद झाला . मेंडोन्सा हे शिवीगाळ करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे . उत्तन हा पूर्वीपासून गिल्बर्ट मेंडोन्सा हे बालेकिल्ला मानत आले आहेत . परंतु खासदार म्हणून विचारे यांनी ह्या भागात मच्छीमारांसाठी काम केल्याने शिवसेनेचे बर्नड डिमेलो , माजी नगरसेवक जॉर्जी गोविंद व हेलन गोविंद , शर्मिला बगाजी सह बहुसंख्य कार्यकर्त्यांनी विचारे यांची साथ कायम ठेवली . ह्या सर्वानी मेंडोन्सा यांच्या सांगण्यावरून ऐनवेळी शिंदेसेनेचा प्रचार करण्यास नकार दिला . त्यातूनच मतदानाच्या दिवशी ह्या भागात तणातणी दिसून आली . 

मोबाईल बंदी मुळे गैरसोय तर मोबाईल सह दिले प्रवेश 
निवडणूक आयोगाने मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी केल्याने त्या वरून बहुसंख्य मतदारांची मोठी गैरसोय झाली . अनेक ठिकाणी मोबाईल नेण्या वरून खटके उडाले , नाराजी व्यक्त केली गेली . काही ठिकाणी मतदारांनी मोबाईल नाईलाजाने बाहेर ठेवत धोका पत्करला . तर अनेक केंद्रात मोबाईल असल्याची तपासणीच केली जात नव्हती . काही ठिकाणी मोबाईल बंद करून केंद्रात प्रवेश दिला गेला . 

मुख्यमंत्र्यांसह अनेकांनी घेतला आढावा 
मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील मतदानाचा आढावा घेण्यास स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते . तर आमदार गीता जैन , प्रताप सरनाईक सह माजी आमदार मुझफ्फर हुसेन , गिल्बर्ट मेंडोन्सा , नरेंद्र मेहता सह महायुती आणि महाविकास आघाडतील प्रमुख पदाधिकारी हे सकाळ पासून शहरात फिरून कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा आढावा घेत होते . मतदान केंद्र बाहेर आपापल्या उमेदवारासाठी कसे मतदार काढले जात आहेत , काय व्यवस्था आहे , अडचण आदी जाणून घेत होते . 

मतदारांसाठी रिक्षा , सवलत , नाश्ता आदींची सोय
कडक उन्हाळा त्यात मतदान केंद्र लांब असल्याने मतदारांना मतदान केंद्रात येण्या जाण्यासाठी रिक्षा , खाजगी वाहने आदी तैनात केली गेली होती . अनेक भागात मतदारांना चहा , नाश्ता आदींची सोय केली गेली होती . भाईंदरच्या उड्डाणपूल येथील बालाजी कॉम्प्लेक्स येथील हॉटेल मध्ये ५० टक्के सवलत देण्यात आल्याने लोकांची गर्दी झाली होती . 

नव मतदारां मध्ये उत्साह 
पहिल्यांदाच मतदान करण्यास आलेल्या नव मतदारां मध्ये उत्साह आणि आनंद दिसत होता . युवा मतदारांसह आलेल्या पालकांना देखील कौतुक वाटत होते . परंतु एकूणच मतदारां मध्ये मात्र फारसा उत्साह असा दिसला नाही . कडक ऊनाचा सुद्धा परिणाम मतदानावर दिसून आला . सुट्ट्या असल्याने बरेच मतदार गावी गेले आहेत.  

शहरातील अनेक मतदारांची नावे गायब 
मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून गायब करण्यात आली होती . बहुतेकांनी २०१९ मध्ये मतदान केले होते . तसेच ते आजही त्याच ठिकाणी रहात असताना त्यांची नावे गायब केली गेल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला. अनेक मतदार यादीत नाव नसल्याने मतदानाला गेलेच नाही.  अनेकजण  मतदान केंद्र जवळून माघारी फिरले . तर निवडणूक आयोगाचा हा भोंगळ कारभार असून जाणीवपूर्वक अश्या मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी केला .

भाईंदरचे मतदार केंद्र उत्तन येथे 
भाईंदर पश्चिमच्या रेल्वे मार्ग लगत हनुमान चाळ येथील अनेक मतदारांची नावे थेट उत्तन येथील मतदान केंद्रात आल्याचा निवडणूक आयोगाचा भोंगळ प्रकार समोर आला. या मुळे मतदानास इतक्या लांब जाणे शक्य नसल्याने मतदाना पासून त्यांना मुकावे लागले.

मतदान यंत्र बंद पडण्याचे प्रकार 
मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र आणि ओवळा माजिवडा मतदारसंघाच्या मीरा भाईंदर परिसरातील काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडण्याच्या घटना घडल्या . आरबीके शाळा , लोकमान्य शाळा आदी ७ ते ८ ठिकाणी मतदान केंद्र बंद पडल्याचे तसेच काही ठिकाणी तासभर यंत्र बंद असल्याचे प्रकार घडले . मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्रातील मोरवा येथे सकाळी ७ ऐवजी ७ वा . २० मिनिटांनी मतदान केंद्र सुरु केले गेले . भाईंदरच्या जेसलपार्क येथील संत फ्रान्सिस शाळेतील केंद्रात देखील मतदान यंत्र बंद पडले . सुमारे अर्ध्या तासाने दुसरे यंत्र आणण्यात आले. अश्या प्रकारां मुळे मतदान काही काही काळ थांबले होते .  

बोगस मतदानाचे प्रकार 
मीरा भाईंदर मध्ये बोगस मतदानाचे काही प्रकार घडले आहेत . होलिक्रॉस शाळेतील मतदान केंद्रात मतदाराच्या नावाने आधीच कोणीतरी बोगस मतदान करून गेले . नंतर त्याचे मतपत्रिके द्वारे मतदान घेतले .  नया नगर भागात शहनाजबानो शेख ह्या ६४ वर्षाच्या वृद्ध महिलेच्या नावाने आधीच बोगस मतदार मतदान करून गेला . त्यामुळे मतदान न करताच त्या माघारी गेल्या . शांती नगर सेक्टर ८, मतदान केंद्र क्र . ३५१  मध्ये फरीदा अहमद सय्यद ह्या मतदानासाठी गेल्या असता त्यांच्या नावाने आधीच बोगस मतदान केले गेले होते .मीरा गावठाण भागात मतदान केंद्र क्रं. ३९७ मध्ये शहजाद अहमद अन्सारी यांच्या नावाने आधीच बोगस मतदान झाले होते . विशेष म्हणजे मतदार यादीत छायाचित्र असून देखील बोगस मतदान केले गेले . 

रुग्ण , वृद्ध , दिव्यांगांनी सुद्धा केले मतदान 
मीरारोडच्या नया नगर भागात शायदा मोहसीन ह्या गेल्या ४ वर्षांपासून पॅरॅलीस मुळे अंथरुणात खिळलेल्या आहेत . परंतु आजमतदानासाठी त्या आवर्जून रुग्णवाहीकेतून आल्या . व्हीलचेअर वर बसून त्यांनी मतदानचा हक्क बजावला . विद्या मनोहर आचार्य हि बोलता व ऐकता न येणाऱ्या दिव्यांग तरुणीने तसेच विवेक गणेश सिंग ह्या दिव्यांग तरुणा सह अनेक दिव्यांग , वृद्ध नागरिक ,  रुग्णांनी आवर्जून मतदान केले . 

तीन पिढ्यांचे मतदान 
भाईंदर पश्चिमेच्या पूर्वीच्या कातोडी पाडा येथील कातकरी आदिवासी आदिम जमातीतील आजी , मुलगी आणि नातं अश्या तीन पिढ्यांच्या महिलांनी मतदान केले . बुदाबाई शंकर मुकणे ह्या वृद्ध आजी , त्यांची मुलगी गीता लक्ष्मण वाघे आणि नात आशा दिलीप सिनकर ह्या तीन पिढ्यांच्या महिलांनी कुटुंबासह एकत्र येऊन मतदान केले . 
 

Web Title: Voting in Mira Bhayander peaceful but low on enthusiasm; Names of many voters are missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.