वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 06:38 IST2026-01-10T06:33:30+5:302026-01-10T06:38:57+5:30
शिंदेसेनेच्या नेतृत्वाखालील सत्ता आल्यास विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर: प्रथमच मराठी व सिंधी बांधवांचे विश्वास व विकासासाठी महागठबंधन झाले आहे. मराठी व सिंधी यांचे महागठबंधन म्हणजे वडापाव व दाल पकवानसोबत आल्यासारखे आहे, असे नमूद करतानाच शिंदेसेनेच्या नेतृत्वाखालील सत्ता आल्यास विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
गोलमैदानावरील सभेत ते बोलत होते. शिंदेसेना व सहकारी पक्षांनी सभेचे आयोजन केले होते. शिंदे म्हणाले की, ओमी कलानी टीमने शिवसेनेवर विश्वास दाखवून दोस्ती केली. महापालिकेवर शिवसेना, ओमी टीम व साई पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी एकत्र आलो आहोत. सिंधी समाज व्यापारी व उद्योगशील असून, त्यांनी उल्हासनगरचा नावलौकिक राज्यात नव्हे, तर देशात वाढवला. उल्हासनगरात भाजपसोबत शिंदेसेना व मित्रपक्षांची युती नाही. परंतु, शिंदे यांनी भाजपवर टीका करण्याचे टाळले. सभेला पीआरपीचे नेते जयदीप कवाडे, माजी आ. पप्पू कलानी, जीवन इदनानी, ओमी कलानी आदी उपस्थित होते.
सभा सोडून गेल्यास तीन दिवस पाणी येणार नाही
सभेला शिंदे अडीच तास उशिरा आल्याने, काही महिला सभेतून उठून जात होत्या. त्यावेळी सभेचे सूत्रसंचालन करणाऱ्यांनी महिलांनी उठून जाऊ नये. ज्या महिला उठून जातील, त्यांच्या घरी तीन दिवस पाणी येणार नाही, अशी धमकी दिली.