ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 17:56 IST2026-01-02T17:54:26+5:302026-01-02T17:56:46+5:30
ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये आई विरुद्ध मुलगा अशी लढत होत आहे. मुलगा शिंदेसेनेकडून निवडणूक लढवत असून, अपक्ष मैदानात उतरलेल्या आईला आता राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे.

ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
ठाणे महानगरपालिका निवडणुकीत एक अत्यंत चर्चेचा विषय ठरणारी लढत समोर आली असून आई आणि मुलगा थेट एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २३ मध्ये आई प्रमिला केणी आणि शिंदेसेनेचे उमेदवार मंदार केणी आमने-सामने आले आहेत. विशेष म्हणजे हे दोघे केवळ निवडणुकीतच नव्हे, तर एकमेकांविरोधात प्रचारही करणार असल्याने या प्रभागातील राजकीय वातावरण तापले आहे.
शिंदेसेनेने तिकीट न दिल्यामुळे प्रमिला केणी यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्या उमेदवार दिपा गावंडे यांनी माघार घेतली असून, शरद पवार गटाने अधिकृतपणे अपक्ष प्रमिला केणी यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
दरम्यान, मंदार केणी हे शिंदे सेनेतर्फे निवडणूक लढवत असून, तर प्रमिला केणी अपक्ष उमेदवार म्हणून, मात्र शरद पवार गटाच्या पाठिंब्याने रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक २३ ‘ब’ मधून प्रमिला केणी, तर प्रभाग क्रमांक २३ ‘ड’ मधून मंदार केणी निवडणूक लढवत आहेत.
आई-मुलगा आमने-सामने आल्याने हा सामना केवळ राजकीयच नव्हे तर भावनिकदृष्ट्याही अत्यंत संवेदनशील ठरण्याची शक्यता असून, ठाणे महापालिका निवडणुकीतील ही लढत राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.