ठाण्यात ६८ वर्षांपूर्वी निवडणुकीत ६ सदस्यांची बिनविरोध निवड; वृत्तपत्राचे कात्रण सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 08:59 IST2026-01-07T08:59:45+5:302026-01-07T08:59:45+5:30
३० नोव्हेंबर १९५७ या दिवसाचे कात्रण सोशल मीडियावर शेअर केले.

ठाण्यात ६८ वर्षांपूर्वी निवडणुकीत ६ सदस्यांची बिनविरोध निवड; वृत्तपत्राचे कात्रण सोशल मीडियावर व्हायरल
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : महापालिकेचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने शहराच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना ऊत आला आहे. परंतु ६८ वर्षांपूर्वी म्हणजे १९५७ साली झालेल्या ठाणे नगरपालिकेच्या निवडणुकीत ग. मो. कोळी, य. द. ऊर्फ नानासाहेब सुळे, क. के. पावसकर, ताराबाई वैद्य, आशा दत्तात्रय वाघोलीकर, भि. गं. ओक (वकील) हे सहा उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते, अशी माहिती इतिहास अभ्यासक मकरंद जोशी यांनी दिली. जोशी यांनी १९५७ सालच्या ठाणे नगरपालिकेच्या निवडणूक निकालाचे ‘सन्मित्र’ वृत्तपत्राचे ३० नोव्हेंबर १९५७ या दिवसाचे कात्रण सोशल मीडियावर शेअर केले.
तेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ शिगेला पोहोचली होती आणि हे सर्व उमेदवार संयुक्त महाराष्ट्र समितीचे होते. त्या काळात ठाणे नगरपालिकेतील नगरसेवकांची एकूण संख्या ३४ होती. बिनविरोध निवड ही काही नवी बाब नसून तिची परंपरा अनेक दशकांपासून सुरू असल्याचे यातून स्पष्ट होते. अर्थात त्यावेळी झालेल्या बिनविरोध निवडीमागे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे भारावलेले वातावरण होते. यावेळी विजयी झालेले सर्वच उमेदवार हे सत्ताधारी पक्षाचे असून, त्यांच्यासमोरील काँग्रेस, उद्धवसेना, मनसेच्या उमेदवारांनी पळ काढला. या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या बिनविरोधी निवडीमागे काळेबेरे असल्याचा आरोप राज्य निवडणूक आयोगाकडे केलेला आहे.
दरम्यान, हे कात्रण व्हायरल झाल्यानंतर ठाणे शहरातील सुज्ञ नागरिकांनी आपली मते व्यक्त करण्यास सुरुवात केली. काही ठाणेकरांनी १९५७ मधील बिनविरोध निवड आणि सध्याच्या राजकीय वातावरणातील बिनविरोध निवडीतील परिस्थितीत मोठा फरक असल्याचा आरोप केला. तेव्हाची निवड लोकचळवळीच्या पार्श्वभूमीवर होती, तर आताची निवड वेगळ्या राजकीय संदर्भात होत असल्याचे मत व्यक्त केले.