एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 11:51 IST2025-12-28T11:47:15+5:302025-12-28T11:51:19+5:30
TMC Election 2026: ठाण्यात भाजपाला खरोखर युती करायची आहे की, स्वबळावर निवडणूक लढवायची आहे, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
TMC Election 2026: महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुका युतीच्या माध्यमातूनच लढविण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्यात तीन तास महायुतीची तिसरी महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र, तीन ते चार प्रभागांवरून म्हणजेच १२ जागांवरून शिंदेसेना आणि भाजपामध्ये मतभेद कायम आहेत.
ठाण्यातील वर्तकनगर येथील विभागीय कार्यालयात महायुतीची जागावाटपाची बैठक झाली. रविवारपर्यंत जागावाटपाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर महापालिका निवडणुकाही युतीच्या माध्यमातूनच लढविण्यात येणार आहेत. महायुतीची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल आणि उमेदवारांपर्यंत युतीचा संदेश पोहोचविण्यात येईल. महायुतीची पहिली बैठक होण्यापूर्वी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने भाजपासोबत युती न करण्याची भूमिका जाहीर केली होती.
भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
शिंदेसेना आणि भाजप यांच्यातील जागावाटपाचा तिढा कायम असताना ठाण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रासह ‘नमो भारत, नमो ठाणे’ या घोषवाक्यासह बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपला खरोखर युती करायची आहे की स्वबळावर निवडणूक लढवायची आहे, अशा चर्चांना उधाण आले. शहरातील प्रमुख चौक, नाके आणि वर्दळीच्या ठिकाणी शनिवारी ‘नमो भारत, नमो ठाणे’ या आशयाचे बॅनर लावण्यात आले. या बॅनरवर भाजपचे निवडणूक चिन्ह स्पष्टपणे दिसत असून, युतीमधील शिंदेसेनेच्या कोणत्याही नेत्यांचे छायाचित्र किंवा पक्षचिन्ह नाही. शहरभर झळकलेल्या या बॅनरमुळे भाजपने ठाण्यात 'मिशन ठाणे'ची तयारी सुरू केली आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तीन हात नाक्यासह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी हे बॅनर लावण्यात आल्याने भाजपकडून कार्यकर्त्यांना ‘एकला चलो’चा संकेत दिला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, युतीचा निर्णय शनिवारपर्यंत झाला नाही तर स्वबळावर निवडणूक लढवू, असा अल्टिमेटम देणारे भाजपा आमदार संजय केळकर महायुतीच्या तिसऱ्या बैठकीला गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आले होते. तसेच तीन प्रभागांमध्ये ताळमेळ बसत नाही. पुढील २४ तासांत त्यातून मार्ग काढला जाईल आणि युतीच्या माध्यमातून निवडणुका लढविल्या जातील. दोन्ही बाजूने निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडे विषय सोपविला आहे. काही तासांतच याबाबत निर्णय घेऊन युती जाहीर होईल, अशी माहिती भाजपाचे ठाणे प्रभारी निरंजन डावखरे यांनी दिली.