"पोलीस अधिकारी आमच्या उमेदवाराला एकनाथ शिंदेंच्या घरी घेऊन गेला", अविनाश जाधवांनी व्हिडीओच दाखवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 20:35 IST2026-01-04T20:33:12+5:302026-01-04T20:35:44+5:30
महापालिका निवडणुक मतदानापूर्वीच चर्चेत आली, ती उमेदवारांच्या बिनविरोध निवडीवरून. ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये युतीचे सर्वाधिक उमेदवार बिनविरोध आले आहेत. याबद्दल मनसे-उद्धवसेनेच्या नेत्यांनी पुरावे दाखवत एकनाथ शिंदेंवर आरोप केले.

"पोलीस अधिकारी आमच्या उमेदवाराला एकनाथ शिंदेंच्या घरी घेऊन गेला", अविनाश जाधवांनी व्हिडीओच दाखवला
एक पोलीस अधिकारी आमच्या उमेदवाराला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर घेऊन जातो आणि त्यानंतर तो उमेदवार अर्ज मागे घेतो. पोलीस अधिकारी त्याला शिंदेंच्या घरी घेऊन का गेला?, असे सांगत मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी अधिकारी उमेदवाराला घेऊन जातानाचा व्हिडीओ दाखवला.
ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव, उद्धवसेनेचे नेते राजन विचार आणि केदार दिघे यांनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले.
पोलीस उमेदवाराला घेऊन जातानाचा व्हिडीओ दाखवला
अविनाश जाधव मोबाईलमधील पत्रकारांना दाखवत म्हणाले, "हा व्हिडीओ आहे डीसीएमच्या (उपमुख्यमंत्री) घरचा. एक आमचा उमेदवार आहे, त्याला एक पोलीस अधिकारी उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर घेऊन चालला आहे. याचा अर्थ आम्ही जे म्हणतोय की, पैसे देऊन बिनविरोध नगरसेवक निवडून आणले. त्याचे एक उदाहरण देतो", असा गंभीर आरोप अविनाश जाधव यांनी केला.
"विक्रांत धार नावाचा मुलगा आहे. त्यासोबत एक पोलीस अधिकारी आहे, जो एकनाथ शिंदेंच्या घरी चाललेला आहे. बंगल्यावर चाललेला आहे. मला वाटतं की, पोलिसांचा जो वापर केला गेला, पैशांचा वापर. त्याने उद्धवसेनेच्या चिन्हावर अर्ज भरला होता. या मुलाला पोलिसवाला एकनाथ शिंदेंच्या घरी का घेऊन चालला आहे?", असा सवाल अविनाश जाधव यांनी केला.
"हा पुरावा आहे. याची चौकशी का नाही? आम्ही पुरावा देतोय. याच्यानंतरही निवडणूक आयोगाला काही पुरावे हवे असतील तर तेही द्यायला लावू. हा स्पष्ट पुरावा आहे की, एकनाथ शिंदेंच्या घरी एक पोलीस अधिकारी हे आमच्या उमेदवाराला घेऊन गेले आणि त्यानंतर त्याने अर्ज मागे घेतलेला आहे", असे अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.