"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
By धीरज परब | Updated: December 31, 2025 13:00 IST2025-12-31T12:57:14+5:302025-12-31T13:00:07+5:30
मीरा भाईंदर महापालिकेमध्ये भाजपा-शिंदेसेनेची युती तुटली आहे. युती तुटल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर टीकास्त्र डागले.

"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
- धीरज परब, मीरारोड
मीरा भाईंदरमध्ये आमदार नरेंद्र मेहतांच्या घमेंडी वृत्तीमुळे भाजपा-शिवसेना महायुती झाली नाही. मेहतांच्या ह्याच घमेंडी आणि मनमानी वृत्तीमुळे २०१९ मध्ये मीरा भाईंदरच्या जनतेने त्यांना धडा शिकवला होता. तसाच धडा या महापालिका निवडणुकीत जनता पुन्हा शिकवेल", असा घणाघात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. महापालिकेतील मेहतांची मनमानी फक्त शिवसेना आणि प्रताप सरनाईकच रोखू शकतो असे ते म्हणाले.
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत महायुतीतीलभाजपा, शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित पवार) हे सर्वच पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. भाजपाने ८७ जागी, तर शिंदेसेनेने ८१ जागी उमेदवार दिले असून, राष्ट्रवादीच्या ३४ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. महायुती तुटल्यामुळे भाजपा व शिंदेसेनेत खरी लढत होणार आहे.
प्रताप सरनाईक मेहतांबद्दल काय बोलले?
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, "मैत्री पूर्ण लढायचे होते तर महायुतीमध्ये हातात हात घालून लढायचे होते. आम्ही हक्काचे मागत होतो, ठाणे पॅटर्न प्रमाणे. शिवसेनेची अवहेलना आणि अपमान सहन करणार नाही. शिवसेनेने ८१ भारतीयांना उमेदवारी दिली आहे. मेहतांनी उमेदवार सांगताना जाती-पतीचा उल्लेख करून समाजात दुफळी माजवण्याचे काम केले आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्व जाती-समाजाला एकत्र जोडण्याचे काम करत असताना मेहता मात्र तोडण्याचे काम करत असून त्यांच्या अशा राजकारणाचा निषेध करतो", अशी टीका सरनाईक यांनी केली.
"मेहतांच्या घमेंडी वृत्तीमुळे महायुती झाली नाही. हीच घमेंड आणि मनमानी वृत्तीमुळे २०१९ ला मीरा भाईंदरच्या जनतेने मेहतांना धडा शिकवला होता, तसाच धडा या महापालिका निवडणुकीत त्यांना जनता पुन्हा शिकवेल. महापालिकेतील मेहतांची मनमानी फक्त शिवसेना आणि प्रताप सरनाईकच रोखू शकतो", असा इशाराही सरनाईक यांनी यावेळी दिला.
"शिवसेना ५० पेक्षा जास्त जागा जिंकेल. मेहताने पराभवाच्या भीतीने स्वतःच्या मुलाला उमेदवारी दिली नाही", असे म्हणत मंत्री सरनाईक यांनी आमदार मेहतांना डिवचले.
आमदार मेहतांनी काय मांडली होती भूमिका?
भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, "भाजपाने मराठी भाषिक २४, आगरी समाजास १५, गुजराती १२, राजस्थानी-जैन १४, उत्तर भारतीय १४, पंजाबी १, बंगाली १, दक्षिण भारतीय २, ख्रिश्चन समाजाच्या ४ जणांना उमेदवारी दिली आहे."
"सर्व समाजाला स्थान दिले आहे. मागच्या वेळीपेक्षा जास्त जागा उत्तर भारतीयांना दिल्या आहेत. सर्वेनुसार ज्यांच्या सोबत जनाधार होता, त्यांना पक्षाने न्याय देत उमेदवारी दिली. काही चांगल्या उमेदवारांना उमेदवारी देता आली नाही. बऱ्याच जणांनी माघार घेतली आहे व ज्यांनी नाही घेतली, त्यांना समजावून ते पण मागे घेतील", असे आमदार मेहता म्हणाले.
"१ जागा आरपीआयच्या उमेदवार निर्मला सावळे यांना दिली आहे, पण त्या आमच्या चिन्हावर लढवणार आहेत. शिंदेसेनेला युतीसाठी १३ जागा देऊ केल्या होत्या. त्या ठाणे पॅटर्न प्रमाणेच होत्या. भाजपा यावेळी ७० पेक्षा जास्त जागा जिंकेल", असेही आमदार मेहतांनी सांगितले.