उल्हासनगरातील गुंडाराज संपवून शहराचा चेहरामोहरा बदलणार; CM देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 22:06 IST2026-01-07T22:06:22+5:302026-01-07T22:06:54+5:30
एमएमआरडीएच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी ४ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.

उल्हासनगरातील गुंडाराज संपवून शहराचा चेहरामोहरा बदलणार; CM देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर?
सदानंद नाईक
उल्हासनगर - महापालिका स्थापनेनंतर गेल्या ३० वर्षांपासून सत्तेत असलेल्यांनी उल्हासनगरला काय दिले? आज शहराची अवस्था गावापेक्षाही वाईट झाली आहे. पण आता हे चित्र बदलायचे आहे. शहरात गुंडेशाही मोडीत काढून कायद्याचे राज्य प्रस्थापित करणार असून उल्हासनगरला उन्नत करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासासाठी हजारो कोटींच्या निधीची घोषणा करत त्यांनी शहराच्या कायापालटाचा रोडमॅप सादर केला. पायाभूत सुविधांसाठी दिल्याचे सांगून शहराच्या दुरवस्थेवर बोट ठेवत मुख्यमंत्र्यांनी विकासाचा मोठा आराखडा मांडला. एमएमआरडीएच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील विविध विकासकामांसाठी ४ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्ते आणि वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली. शहरवासियांचा प्रवास सुखकर करण्यासाठी शहराला मेट्रो नेटवर्कशी जोडले जाणार आहे. तसेच, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी इ-बसेस सुरू करण्यात येणार असून ट्रान्सपोर्ट सुविधेचे जाळे विस्तारले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
भुयार गटार योजना
शहरातील सांडपाणी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठी गुंतवणूक केली जात असल्याचे संकेत दिले आहे. अमृत योजनेअंतर्गत ८६८ कोटी रुपये खर्चून भुयारी गटार योजना राबवण्यात येत असून मलशुद्धीकरण केंद्रात सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच नदीत सोडले जाईल.
विविध योजना
पाणीपुरवठ्यासाठी २२० कोटी आणि नवीन जलस्रोत विकसित करण्यासाठी ६३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ७२४ कोटी रुपये खर्चून गरजू लोकांसाठी ३ हजार घरे बांधली जाणार आहे.
अवैध बांधकामांवर तोडगा आणि नवीन नीती
शहरातील जुन्या अवैध इमारती नियमित करण्यासोबतच, भविष्यात अवैध बांधकामे होऊ नयेत, यासाठी सरकार नवे धोरण राबवणार आहे. यामुळे सामान्यांच्या घरांचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
विविधेत एकता
उल्हासनगर हे विविधतेत एकता जपणारे शहर आहे. येथे सर्व धर्मीय आणि भाषिक नागरिक प्रेमाने राहतात. अशा शहराचा विकास करणे आमचे कर्तव्य आहे. येथे गुंडाराज चालणार नाही, फक्त विकासाचे आणि कायद्याचे राज्य चालेल. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री