Thane Lok Sabha election result 2019: Rajan Vichare again in Delhi | ठाणे लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : मोदी करिष्म्याने राजन विचारे पुन्हा दिल्लीत
ठाणे लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : मोदी करिष्म्याने राजन विचारे पुन्हा दिल्लीत

- अजित मांडके
ठाणे : निवडणुकीपूर्वी राष्टÑवादीचे आनंद परांजपे विरुद्ध शिवसेनेचे राजन विचारे यांच्यात कडवी झुंज होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. शिवाय, विचारे यांच्याविरोधात भाजपमध्ये असलेल्या मतप्रवाहाचा फायदा परांजपे यांना होईल आणि एक सुशिक्षित उमेदवार म्हणून परांजपे यांच्याकडे पाहिले जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु, या तर्कांना छेद देत, ठाणे लोकसभा मतदारसंघात पुन्हा विचारे यांनी आपला विजय निश्चित केला. मागील वेळेच्या तुलनेत यंदा त्यांचे मताधिक्य जास्त आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे दोन आमदार, भाजपचे तीन आमदार आहेत. तर ठाणे, मीरा-भार्इंदर महापालिकेवर शिवसेना, भाजपचेच वर्चस्व होते. राष्टÑवादीला ठाण्यासह मीरा-भार्इंदरमध्ये मतांसाठी तारेवरची कसरत करावी लागणार होती. केवळ ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघांतून परांजपे यांना निर्णायक मते मिळतील, अशी अपेक्षा होती. परंतु, प्रत्यक्षात राष्ट्रवादीच्या सर्वच अपेक्षा फोल ठरल्या आहेत. शिवसेनेने आखलेली रणनीती यशस्वी झाली आहे. शिवाय, निवडणुकीपूर्वीच विचारे हे साडेतीन लाख मतांनी निवडून येतील, असा दावा शिवसेनेने केला होता. तो दावा निकालात तंतोतंत खरा ठरला आहे. अगदी सुरुवातीला विचारे यांच्याविरोधात भाजपच्या नगरसेवकांनी थोपटलेले दंड आणि रिपाइं विचारे यांच्याशी पुकारलेला असहकार यामुळे विचारे अडचणीत असल्याचे जाणवले होते. मात्र, कालांतराने सर्व मतभेद मिटले आणि मोदीलाटेने उरलेसुरले मतभेद चक्क धुऊन काढले. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून निर्णायक आघाडी घेत विचारे यांनी ठाणे मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.

राष्टÑवादीमध्ये निवडणुकीपूर्वी गटातटांचे राजकारण होते. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात सर्व गटतट एकत्र झाल्याचे दिसून आले होते. नवी मुंबईचे शिलेदार गणेश नाईक स्वत: या निवडणुकीत उतरले होते. त्याचा परांजपे यांना फायदा होईल, असे मानले जात होते. शिवाय, परांजपे यांना वडिलांच्या राजकीय वारशाचा फायदा होईल, अशी त्यांची अपेक्षा होती. त्यामुळे ठाण्यात ‘काँटे की टक्कर’ होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात ती एकतर्फी झाली. विचारे यांना घेरण्यासाठी ज्या काही युक्त्या राष्टÑवादीकडून करण्यात आल्या, सपशेल फेल ठरल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.

राष्टÑवादीला ऐरोली, बेलापूर तसेच मीरा-भार्इंदरमधूनसुद्धा मते प्राप्त झाली आहेत. मीरा-भार्इंदरमधून काँग्रेसचे नेते मुझफ्फर हुसेन यांची साथ लाभण्याकरिता विधानसभेच्या निवडणुकीत हा मतदारसंघ त्यांना बहाल करण्यात आला. परंतु, काँग्रेस मीरा-भार्इंदरमध्ये अपेक्षित मताधिक्य देऊ शकले नाही.

आघाडीची चिंता वाढली

तीन लाखांहून अधिक नवमतदारांचीमते या निवडणुकीत महत्त्वाची ठरली. त्यांनी मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याकरिता मतदान केल्याचे बोलले जात आहे. मुदलात मोदींच्या बाजूची लाट, शिवसेना-भाजपचे संघटन यामुळे राजन विचारे यांचा सलग दुसऱ्यांदा लोकसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या मताधिक्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सेना - भाजपचा मार्गही सुकर झाला आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात या मताधिक्यामुळे युतीला दिलासा मिळाला आहे. मतदारसंघातील ऐरोली विधानसभा मतदारसंघ वगळता इतर पाचही मतदारसंघांत युतीचेच वर्चस्व आहे. ते विधानसभेत कायम राहील, असेच चित्र असून ऐरोलीत ते राष्टÑवादीच्या संदीप नाईक यांना जोरदार धक्का देऊ शकतात, असे मतदानाच्या आकडेवारीवरून दिसते.

5 कारणे विजयाची

गटातटांचे राजकारण असतानाही शिवसैनिकांचे एकजुटीने काम.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मतदारसंघ पिंजून काढला होता.
मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचे असल्याने त्यांच्या नावावर मते मागितली गेली.
शिवसेना उमेदवाराला शिवसेनेची तसेच भाजपाची मते मिळाली.
तरुणवर्गानेही यंदा पुन्हा मोदींना पसंती दिल्याचा विचारे यांना फायदा.

आनंद परांजपे यांच्या पराभवाची ५ कारणे

सुरुवातीला गणेश नाईक यांचे नाव चर्चेत असताना शेवटच्या क्षणी त्यांनी विरोध केल्याने राष्टÑवादीची वाट खडतर.
पिता प्रकाश परांजपे यांच्या नावाचा फायदा होईल, अशी शक्यता वाटत होती. परंतु, ती फोल ठरली.
ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातून निर्णायक आघाडी मिळाली नाही.
गणेश नाईक विरुद्ध जितेंद्र आव्हाड यांच्यात असलेल्या संघर्षामुळे परांजपे यांचा पराभव.
शिवसेनेला भाजपने जशी साथ दिली, तशी साथ राष्टÑवादीला काँग्रेसने दिली नाही.

जनतेच्या निर्णयाचा आदर
जनतेने जो कौल दिलेला आहे, तो मान्य आहे. त्यांच्या निर्णयाचा मी आदर करतो. परंतु, केवळ मोदींना मतदान झाल्याने हा पराभव झाला आहे.
- आनंद परांजपे, पराभूत उमेदवार, राष्टÑवादी

पोलीस उपाशी, पाण्यापासूनही वंचित
ठाणे - ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या ठिकाणी गुरुवारी सुमारे ७०० पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. चोख बंदोबस्तामुळे याठिकाणी रात्री उशिरापर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. परंतु, बंदोबस्तावरील अनेक कर्मचाºयांना दुपारचे जेवण आणि पाणीही मिळाले नसल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.

गेल्या महिनाभरापासून उत्कंठा शिगेला गेल्यामुळे ठाणेकरांसह शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस राष्टÑवादी आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्येही निकालाची उत्सुकता होती. याच पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून महिनाभरापासूनच मतमोजणीकेंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त होता. गुरुवारी तो अधिकच कडक करण्यात आला. येथे कळवा, वागळे इस्टेट, वर्तकनगर, कापूरबावडी, कासारवडवली आणि चितळसर तसेच पोलीस मुख्यालयातील सुमारे ७०० पोलीस कर्मचारी तैनात केले होते. या सर्वच कर्मचाºयांची तसेच निवडणूक कर्मचा-यांची निवडणूक निर्णय अधिकाºयांनी जेवण, नाश्ता आणि पाण्याची सोय केली होती. तरीही, अनेक पोलीस जेवण आणि पाण्यापासून वंचित राहिले.

मतमोजणीकेंद्रावर तैनात पोलिसांना आहारभत्ता दिला जातो. जिल्हाधिकाºयांकडून त्यांच्या जेवणाची सोय केली जाईल, अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. तरीही चौकशी केली जाईल, असे सहपोलीस आयुक्त मधुकर पांडेय म्हणाले.
 


Web Title: Thane Lok Sabha election result 2019: Rajan Vichare again in Delhi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.