पैसे वाटपाच्या आरोपावरून ठाण्यातील दोन प्रभागांमध्ये तणाव; रोकड जप्त, कार्यकर्ते एकमेकांना भिडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 06:44 IST2026-01-15T06:44:19+5:302026-01-15T06:44:43+5:30
वर्तकनगरमध्ये एनसी दाखल तर कापूरबावडीमध्ये चौकशी सुरू

पैसे वाटपाच्या आरोपावरून ठाण्यातील दोन प्रभागांमध्ये तणाव; रोकड जप्त, कार्यकर्ते एकमेकांना भिडले
ठाणे : ईव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक दाखविण्याच्या नावाखाली शिंदेसेनेकडून प्रभाग क्र. सहामध्ये प्रचार सुरू असल्याच्या तक्रारीवरून वर्तकनगर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रभाग क्रमांक तीनमध्ये शिंदेसेनेतून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांचे कार्यकर्ते पैसे वाटप करीत असल्याचा आरोप अपक्ष उमेदवार दत्ता घाडगे यांच्यासह इतरांनी केला. या घटनेत ३६ हजारांची रोकड जप्त केली असून उद्धवसेना आणि शिंदेसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. निवडणूक विभागाकडून खातरजमा करण्यात येत असल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी बुधवारी दिली.
महापालिका निवडणुकीचा प्रचार संपला असला तरी ठाण्यात घरोघरी ईव्हीएम मशीनचे डेमो दाखविण्याच्यानिमित्ताने शिंदेसेनेच्या उमेदवारांच्या काही कार्यकर्त्यांनी बुधवारी दुपारी प्रभाग क्रमांक सहामध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप विरोधी उमेदवारांनी केला. याची वर्तकनगर पोलिसांसह निवडणूक विभागाने खातरजमा केली असता, त्याठिकाणी पैशांचे वाटप नसून केवळ प्रचार पत्रके वाटप होत असल्याचे आढळले. याप्रकरणी शिंदे सेनेचे सचिन बागुल आणि नंदकिशोर आरजेकर या दोघांविरुद्ध अदखलपात्र (एनसी) दाखल झाल्याची महिती पोलिसांनी दिली.
उद्धवसेना आणि शिंदेसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले
यावेळी उद्धवसेना आणि शिंदेसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यांनी परस्परांना धक्काबुक्की केली. त्यामुळे याठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रभाग क्रमांक ३ मध्ये शिंदेसेनेतून बंडखोरी केलेले अपक्ष भूषण भोईर यांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन पैसे वाटत असल्याचाही आरोप झाला. यामध्ये ३६ हजारांची रोकडही मिळाली. संबंधित तरुणांनी मात्र रोकड आपली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकाराबाबतची खातरजमा पोलिस आणि निवडणूक विभागाकडून करण्यात येत आहे. या दोन्ही प्रकारांमुळे ठाण्याच्या प्रभाग क्रमांक ६ आणि ३ मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.