सोशल मीडियावर होता भाजपचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 01:11 AM2019-04-28T01:11:18+5:302019-04-28T01:11:33+5:30

सध्या इंटरनेटचा जमाना असल्याने व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आदींच्या माध्यमातून भिवंडी लोकसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळाली

On the social media was BJP's emphasis | सोशल मीडियावर होता भाजपचा भर

सोशल मीडियावर होता भाजपचा भर

Next

भिवंडी : सध्या इंटरनेटचा जमाना असल्याने व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आदींच्या माध्यमातून भिवंडी लोकसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळाली. त्यासाठी भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांची वॉर रूम सज्ज होती. पाटील यांचा दिवसभराचा दिनक्रम, भेटीगाठी, रॅली, दौरे आदींचा तपशील तेथून फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपद्वारे अपलोड करण्यात आला. पाटील यांच्या फेसबुक पेजला एक लाख ७५ हजार जणांनी फॉलो केले आहे.

लोकसभा निवडणुकीत तरुण मतदार खासकरून नवमतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया हा चांगला पर्याय असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला गेला. वॉर रूमही यासाठी सज्ज होती. मागील काही दिवसांपासून या रूममधून सोशल मीडियावर पाटील यांचा प्रचार करण्यात आला. पाटील यांनी मागील पाच वर्षांत मतदारसंघात केलेली विकासकामे, केंद्र सरकारच्या राबवलेल्या योजनांची माहिती यातून मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आली.

वॉर रूममध्ये सहा जणांची टीम कार्यरत होती. यू-ट्युबवरही काही व्हिडीओ अपलोड केले आहेत. कार्यकर्त्यांना संदेश, मार्गदर्शन करण्याबरोबरच अधिकाधिक मतदारांना प्रवृत्त करण्यासाठीही सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात आला.

कशी चालते यंत्रणा?
साधारण पाच ते सहा महिन्यांपासून कामाला सुरुवात झाली होती. यात मतदारसंघात केलेली विकासकामे मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आली.

केंद्र सरकारने राबवलेल्या योजनांचा कसा फायदा झाला, लाभार्थ्यांचे म्हणणे व्हिडीओच्या माध्यमातून मांडण्यात आले. यात मागील पाच वर्षांतील योजनांचा समावेश होता.

प्रचार, मोठ्या नेत्यांच्या झालेल्या सभा यांचे व्हिडीओ, फोटो लगेचच फेसबुक, ट्विटरवर अपलोड केले जात होते. पाटील यांची मुलगी श्रेया, मुलगा सिद्धेश, पुतणे देवेश, सुमित, प्रशांत यांनी काम पाहिले.

1,75,000
लाइक्स भाजप उमेदवार कपिल पाटील यांच्या फेसबुक पेजला आहेत. त्यांच्या पेजवरून रोज पोस्ट टाकल्या जात होत्या. दररोजच्या दौऱ्यांचे अपडेट्सही दिले जात होते.

2,500
जणांना पाटील यांच्या वॉर रूमच्या माध्यमातून ट्विटरवर रोज पोस्ट पाठवल्या जात होत्या. या दोन्ही माध्यमांवर अधिक लक्ष केंद्रित केले होते.

Web Title: On the social media was BJP's emphasis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.