‘शुभदीप’, ‘सद्गुरू’ अन् ‘पलावा’ येथून हलली सूत्रे; एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, रवींद्र चव्हाण यांनी केले ऑपरेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 15:09 IST2026-01-03T15:09:16+5:302026-01-03T15:09:44+5:30
पहाटेपर्यंत या बंगल्यांपाशी मोटारींचा ताफा उभा असतो, नेते, पदाधिकारी यांची वर्दळ असते, याच बंगल्यांतून सुटलेल्या आदेशांची तंतोतंत अंमलबजावणी करणारी फळी तैनात आहे. जवळपास ९० टक्के बंडखोरांना रिंगणातून बाहेर काढण्यात या तीन सत्ताकेंद्रांना यश आल्याचा दावा केला जात आहे.

‘शुभदीप’, ‘सद्गुरू’ अन् ‘पलावा’ येथून हलली सूत्रे; एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, रवींद्र चव्हाण यांनी केले ऑपरेशन
ठाणे/डोंबिवली : महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीतील राजकारणाची व मुख्यत्वे बंडखोरांना थंड करून निवडणुका बिनविरोध करण्याची सूत्रे ठाण्यातील ‘शुभदीप’ या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या, डोंबिवलीतील ‘पलावा’ येथील भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आणि डोंबिवलीतील ‘सद्गुरू’ या खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यावरून मागील दोन-चार दिवस हलत होती. पहाटेपर्यंत या बंगल्यांपाशी मोटारींचा ताफा उभा असतो, नेते, पदाधिकारी यांची वर्दळ असते, याच बंगल्यांतून सुटलेल्या आदेशांची तंतोतंत अंमलबजावणी करणारी फळी तैनात आहे. जवळपास ९० टक्के बंडखोरांना रिंगणातून बाहेर काढण्यात या तीन सत्ताकेंद्रांना यश आल्याचा दावा केला जात आहे.
महायुतीतील उमेदवारांसमोरील बंडखोरी आणि अपक्ष उमेदवारींच्या पार्श्वभूमीवर महायुतीची समन्वय बैठक ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गुरुवारी पार पडली. या बैठकीनंतर ९० टक्के बंडखोर उमेदवार उमेदवारी मागे घेतील, असा दावा दोन्ही पक्षांकडून करण्यात आला. बंडखोरांना विविध पदांची आमिषे दाखवण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीत महायुतीच्या अधिकृत उमेदवारांव्यतिरिक्त अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीला माजी खा. राहुल शेवाळे, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, आ. आशिष शेलार, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, तसेच शिंदेसेनेचे चार प्रतिनिधी उपस्थित होते. बंडखोरीमुळे महायुतीच्या उमेदवारांना होणाऱ्या संभाव्य नुकसानीवर चर्चा करत समन्वय समितीची बैठक घेण्यात आली. कुठल्या बंडखोराशी कुणी बोलायचे, काय आश्वासन द्यायचे, याचे निर्णय याच बैठकीत झाले. काही बंडखोरांना या बैठकीतून फोन करण्यात आले. महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार बिनविरोध निवडून आणणे आणि महायुतीचा महापौर निवडून आणणे याबाबत चर्चा झाली. ठाण्यातील शिंदेसेनेच्या काही उमेदवारांना मुंबई पालिका निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. त्यांना बिनविरोध निवडून आणण्याची योजना आखली.
१८ मध्ये मनधरणी करण्यात अपयश
प्रभाग क्रमांक १८ मध्ये संपूर्ण पॅनलच शिंदे सेनेला बिनविरोध निवडून आणायचे होते. तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले. दीपक वेतकर यांच्या समोर असलेल्या उमेदवाराची मनधरणी करण्यात अपयश आले. प्रभाग क्रमांक पाचमध्ये परिषा सरनाईक यांच्यासमोरील महिला उमेदवाराने माघार घेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न झाले.
भाजपने त्यांना तिकीट नाकारल्याने त्या अपक्ष लढत आहेत. त्यांना माघार घ्यायला लावण्यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी प्रयत्न झाले परंतु अखेरच्या क्षणी ते अफसल झाले.
दोन्ही पक्षांच्या टीम कार्यरत
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे गेले काही दिवस दररोज दिवसभर दौैरा करतात आणि रात्री पलावा येथील त्यांच्या बंगल्यावर बैठकांचा सिलसिला सुरू असतो. जिल्हाध्यक्ष नंदू परब तसेच नाना सूर्यवंशी आदी नेते, पदाधिकाऱ्यांची टीम येथे असते. चव्हाण यांचे बंडखोरांशी बोलणे झाल्यावर त्यांच्या भेटीगाठी घेणे व समजूत काढणे हे काम ही टीम करते. तिकडे डोंबिवलीतील ‘सद्गुरू’ बंगल्यावर खा. श्रीकांत शिंदे, आ. राजेश मोरे व अभिजीत दरेकर ही मंडळी बंडखोरांशी संवाद साधत होती.