सूचकाच्या अर्जावरून अपक्षाचा अर्ज मागे घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड, ठाण्यात काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 19:34 IST2026-01-05T19:33:07+5:302026-01-05T19:34:10+5:30
ठाण्यातील अपक्ष उमेदवार विक्रम चव्हाण यांनी याबाबत निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

सूचकाच्या अर्जावरून अपक्षाचा अर्ज मागे घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड, ठाण्यात काय घडलं?
ठाणे - राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये बऱ्याच ठिकाणी सत्ताधारी महायुतीचा बिनविरोध पॅटर्न पाहायला मिळाला. मतदानापूर्वीच महायुतीचे ६० हून अधिक उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यावरून विरोधकांनी मोठा आरोप केला. विरोधी उमेदवारांवर दबाव आणून, त्यांना धमकावत, पैशांचे आमिष दाखवून निवडणुकीतून माघार घेण्यास भाग पाडले जात होते. त्यात निवडणूक अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणाही सहभागी होती असा दावा मनसेने केला आहे. त्यात ठाण्यातील आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यात अपक्ष उमेदवारालाच माहिती नसताना त्याचा अर्ज माघारी घेण्यात आल्याचे समोर आले.
ठाण्यातील अपक्ष उमेदवार विक्रम चव्हाण यांनी याबाबत निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. विक्रम चव्हाण म्हणाले की, ज्यादिवशी उमेदवारी अर्ज माघारी घ्यायचे होते त्याच्या आदल्या रात्रीपासून मला कॉल येत होते. तुमचा अर्ज माघारी घ्या, काही उपयोग नाही असं सांगण्यात येत होते. मी दुसऱ्या दिवशी माझा फोन बंद करून ठेवला होता. ३ वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असते. त्यात मी अर्ज मागे घेतला नाही त्यामुळे आता निवडणूक लढायची आहे हे मी ठरवले. मात्र साडे चार-पाच वाजता २ जणांनी माझ्या सूचकांना घरातून घेऊन जाऊन त्यांच्या अर्जावर सही घेत मी उपलब्ध नाही, माझ्या घरात काहीतरी दुर्घटना घडली आहे त्यामुळे बाहेर गेलोय असं सांगत अर्ज मागे घेतला असं त्यांनी सांगितले.
तसेच ७.३० च्या सुमारास यादी बाहेर लागल्यानंतर हा प्रकार मला कळला. मी तिथे गेलो आणि तिथे प्रवेशही करायला देत नव्हते. पण कसेबसे मी आत गेलो. तेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांना चूक लक्षात आली. त्यानंतर ते माझ्याकडे अर्ज मागत होते. पण इतक्या सहजपणे तुम्ही एखाद्याला बिनविरोध कसे काय करू शकता, मग तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज लिहून द्यायला सांगितला. त्यानंतर मी संपूर्ण घटनाक्रमाने अर्ज लिहून दिला. मग अर्ज माघारी घेण्याच्या यादीतून माझे नाव काढण्यात आले असा आरोप अपक्ष उमेदवार विक्रम चव्हाण यांनी केला.
दरम्यान, ठाण्यात ३३ प्रभागांतील १३१ जागांसाठी एकूण १४१ अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी ५५ अपक्ष उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने आता तब्बल ८६ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. महायुती तसेच आघाडीतील नेत्यांनी बंडखोरांचे बंड शमवण्यासाठी प्रयत्न करत सुमारे ९० टक्के बंडखोरी आटोक्यात आणल्याचा दावा केला आहे. मात्र दुसरीकडे, अपक्ष उमेदवारांचे आव्हान कायम असून त्यामुळे प्रमुख पक्षांची डोकेदुखी वाढली आहे.