शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
By अजित मांडके | Updated: December 30, 2025 20:27 IST2025-12-30T20:22:38+5:302025-12-30T20:27:00+5:30
Thane Municipal Election 2026: ठाणे महापालिकेची यावेळची निवडणूक चुरशीची होताना दिसत आहे. उमेदवारी देण्यापासूनच गोंधळ बघायला मिळत असून, शिंदेसेनेने उमदेवादी देताना १४ माजी नगरसेवकांना तिकीट नाकारले आहे.

शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
-अजित मांडके, ठाणे
युती झाल्यानंतर उमेदवारी घोषित करेपर्यंत अनेकांच्या जीवांची घालमेल सुरु होती. अशातच शिंदेसेना आणि भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारत नव्या चेहऱ्यांना संधी दिली, तर भाजपाने चार विद्यमान नगरसेवकांना डावलले आहे. त्यामुळे अनेकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. काहींनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत.
दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे मंगळवारी (३० डिसेंबर) पहाटेपासून अधिकृत उमेदवारी अर्ज (एबी फॉर्म) देण्यास सुरुवात करण्यात आली. यासाठी सोमवारी (२९ डिसेंबर) सायंकाळपासूनच इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी पक्ष कार्यालयांबाहेर ठिय्या मांडल्याचे चित्र दिसून आले. रविवारी रात्री उशिरा भाजपा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच अनेक इच्छुकांचा रोष उफाळून आला.
नरेश म्हस्केंच्या मुलालाही तिकीट नाही
दरम्यान, टेंभीनाका येथील आनंदाश्रम परिसरात शिंदेसेनेमधील इच्छुकांची मोठी गर्दी जमली होती. अधिकृत उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यामध्ये खासदार नरेश म्हस्के यांचे पुत्र आशुतोष म्हस्के यांचाही समावेश होता.
उमेदवारी नाकारल्याचे समजताच काही इच्छुक भावनिक झाले असून, त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहताना दिसले. काहींनी पक्षपदाचा राजीनामा देत उघड नाराजी व्यक्त केली.
नव्या चेहऱ्यांना संधी
शिंदेसेनेकडून साधना जोशी, एकनाथ भोईर, पुर्वेश सरनाईक, आशा डोंगरे, मधुकर पावशे, भूषण भोईर, रुचिता मोरे, मनिषा कांबळे, प्रभा बोरिटकर, राजेंद्र साप्ते, मंगल कळंबे, प्रियंका पाटील आणि सुनिता मुंडे या विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी नाकारली आहे.
काही ठिकाणी कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्यात आली असून, रुचिता मोरे यांच्या जागी त्यांचे पती राजेश मोरे, एकनाथ भोईर यांच्या जागी त्यांची सून यज्ञा भोईर, तर भूषण भोईर यांच्या जागी त्यांची पत्नी सपना भोईर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपाकडून माजी नगरसेविका कविता पाटील, केवलादेवी यादव, सुवर्णा कांबळे आणि दीपा गावंड यांना डावलण्यात आले असून, त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
तिकीट नाकारल्यामुळे बंडखोरी वाढली
टेंभीनाका प्रभागातून शिंदेसेनेकडून माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर इच्छुक निखिल बडजुडे आणि विकास दाभाडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
प्रभाग क्रमांक १५ मध्ये उमेदवारी नाकारल्याने भाजपाचे माजी नगरसेवक राजकुमार यादव, वर्षा पाटील आणि शिंदेसेनेचे महेंद्र सोडारी यांनी आधी राष्ट्रवादीत प्रवेश केला, मात्र काही तासांतच बहुजन समाजवादी पक्षात प्रवेश करून उमेदवारी अर्ज दाखल केला.
याच प्रभागात शिंदेसेनेचे इच्छुक बबुल शेख आणि दशरथ यादव यांनी समाजवादी पक्षातून अर्ज दाखल केला आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये माजी नगरसेवक भूषण भोईर आणि मधुकर पावशे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.